कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात इरफान पठाण (Irfan Pathan) हा सर्वात महत्वाचा स्विंग गोलंदाज म्हणून ओळखला जात होता आणि 2006 मध्ये यादिवशी पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) त्याच्या गोलंदाजीने इतिहास रचला होता. मागील वर्षी क्रिकेटमधून निवृत्त झालेला इरफान 29 जानेवारी 2006 रोजी कसोटी सामन्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये हॅटट्रिक करणारा पहिला गोलंदाज ठरला होता. कराची (Karachi) येथे पाकिस्तानविरुद्ध मालिकेच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात इरफानने हा पराक्रम केला होता. कसोटी क्रिकेटमध्ये हरभजन सिंहनंतर हॅटट्रिक विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला, पण सामन्याच्या पहिल्या षटकात हॅटट्रिक घेण्याचीही पहिली वेळ होती. आयसीसीनेही (ICC) पठाणच्या या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिले दोन सामने अनिर्णीत राहिले होते अशास्थितीत या सामन्याचे महत्व मोठे होते. (On This Day in 2019: आजच्या दिवशी टीम इंडियाने SCG वर केली होती कमाल, ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट मालिका जिंकणारा बनला पहिला आशियाई संघ)
सामन्यात सौरव गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि इरफानने मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये पाकिस्तान संघाचं कंबरडं मोडलं. गांगुलीने इरफानला चेंडू दिला आणि समोर सलमान बट फलंदाजीला उभा होता. पहिल्या तीन चेंडूंवर एकही रन मिळाली नाही आणि त्यानंतर इरफानचा चौथा चेंडू फलंदाजांच्या बॅटच्या कडेला लागून पहिल्या स्लिपमध्ये राहुल द्रविडकडे गेला ज्याने झेल पकडण्यात कोणतीही चूक केली नाही. यानंतर पठाणला युनूस खानला एलबीडब्ल्यू करत माघारी धाडलं. अखेरीस मोहम्मद युसूफला भारतीय गोलंदाजाने इनस्विंगर टाकला त्याच्यापुढे पाकिस्तानी फलंदाज निरुत्तर राहिला. युसूफचा त्रिफळा उडवत पठाणने हॅटट्रिक पूर्ण केली. इरफान पठाणच्या विक्रमी गोलंदाजीपूर्वी श्रीलंकेच्या नुवान झोयसाने त्याच्या आठव्या कसोटी सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी सामन्याच्या पहिल्या तीन चेंडूंवर हॅटट्रिक घेणारा इतिहासातील पहिला खेळाडू होता.
#OnThisDay in 2006, @IrfanPathan became the first bowler to take a hat-trick in the opening over of a Test! 🎩🎩🎩 pic.twitter.com/e9MTTODEwu
— ICC (@ICC) January 29, 2021
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर सुरुवातीच्या धक्क्यानंतर पाकिस्तानने कामरान अकमलच्या खेळीमुळे आपली स्थिती मजबूत केली. कामरान अकमलने 113 धावा केल्या. पाकिस्तानने त्यांच्या डावात 599/7 धावा केल्या आणि भारताला 341 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. पठाणने 29 कसोटी, 140 वनडे आणि 24 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि दक्षिण आफ्रिकाविरूद्ध टी-20 मध्ये ऑक्टोबर 2012 मध्ये संघासाठी अंतिम सामना केला होता.