NZ vs ENG 5th T20I:  न्यूझीलंड-इंग्लंड संघात झाली विश्वचषकमधील सुपर-ओव्हरची पुनरावृत्ती, 'या' संघाने मारली बाजी
इंग्लंड आणि न्यूझीलंड (Photo Credit: Getty Images)

इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात झालेल्या विश्वचषक फायनल मॅचची पुनरावृत्ती झाली. रविवारी या दोन्ही संघात झालेल्या सामन्यात विश्वचषक फायनलच्या आठवणी जाग्या झाल्या. 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडला पराभूत करत मालिका 3-2 ने जिंकली. पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात 11-11 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिले फलंदाजी करत न्यूझीलंडने 5 गडी गमावून 146 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडनेही 11 षटकांत 146 धावा केल्या. स्कोअर बरोबरीनंतर इंग्लंडने सुपर-ओव्हर सामना 8 धावांनी जिंकला. इंग्लंडकडून सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार इऑन मॉर्गन (Eoin Morgan) आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याने दोन षटकार ठोकत 17 धावा केल्या. मॉर्गनने टीम साऊदी (Tim Southee) याच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला तर बेअरस्टोने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला. (NZ vs ENG 4th T20I: डेव्हिड मालन याने इंग्लंडसाठी झळकावले सर्वात जलद टी-20 शतक, इयन मॉर्गन च्यासाथीने केला सर्वाधिक भागीदारीचा रेकॉर्ड)

इंग्लंडकडून 17 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मार्टिन गुप्टिल (Martin Guptill), टिम सेफर्ट (Tim Seifert) आणि कॉलिन डी ग्रैंडहोम (Colin de Grandhomme) यांनी फलंदाजी केली पण क्रिस जॉर्डन (Chris Jordan) याच्या ओव्हरमध्ये त्यांना 8 धावांची मजल मारता आली. 5 सामन्यांच्या टी -20 मालिकेचा शेवटच्या सामन्यात पाहिलं फलंदाजी करताना सलामी फलंदाज गुप्टिल आणि कॉलिन मुनरो (Colin Munro) यांनी आतिशी फलंदाजी करत 11 ओव्हरमध्ये 5 गडी गमावून 146 धावा केल्या. गुप्टिल 50, तर मुनरो 46 धावांवर बाद झाला. गुप्टिलने 20 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 50 धावांची तुफानी खेळी केली. मुनरोने 21 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह 46 धावा केल्या. न्यूझीलंडने दिलेल्या 146 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामी फलंदाज टॉम बंटन 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर बेअरस्टोने 18 चेंडूत 47 धावा केल्या. कर्णधार मॉर्गन 17, सॅम करन 24 आणि टॉम करन यांनी 12 धावा केल्या. अखेरच्या ओव्हरमध्ये हा सामना थरारक ठरला.

इंग्लंड आणि न्यूझीलंडमधील आयसीसी विश्वचषक फायनलही बरोबरीत राहिला होता. याच्यानंतर सुपर ओव्हर टाकण्यात आली दोन्ही संघांमध्ये सुपर ओव्हरही बरोबरीत राहिली आणि नंतर सामन्यादरम्यान अधिक चौकार लगावण्याच्या जोरावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आली. यासह इंग्लंडने प्रथमच विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला.