NZ vs BAN 1st Test: बांगलादेशचा ऐतिहासिक विजय, न्यूझीलंडला 8 विकेटने लोळवून मोडली 32 पराभवाची मालिका; भारत-पाकिस्तानही नाही करू शकले असा कारनामा
बांगलादेश क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

NZ vs BAN 1st Test 2022: न्यूझीलंडच्या (New Zealand) त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी सामना जिंकणे ही कोणत्याही परदेशी संघासाठी मोठी गोष्ट असते. गेल्या 10 वर्षात भारत (India), पाकिस्तान (Pakistan) आणि श्रीलंका यांसारख्या आशियाई संघांनी येथे एकही कसोटी जिंकली नाही परंतु बांगलादेशने (Bangladesh) ही मालिका खंडित केली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी गेल्या 10 वर्षांत न्यूझीलंडमध्ये प्रत्येकी चार कसोटी सामने खेळले आहेत, परंतु दोन्ही संघ विजयापासून दूर राहिले. बांगलादेशने बे ओव्हल (Bay Oval) मैदानावर खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत यजमानांचा आठ गडी राखून पराभव करून 10 वर्षे जुनी मालिका खंडित केली. गेल्या 10 वर्षांत न्यूझीलंडमध्ये केवळ दोनच कसोटी संघ विजयाची नोंद करू शकले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेव्यतिरिक्त, गेल्या 10 वर्षांत इतर कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडला हरवता आलेले नाही. इतकंच नाही तर किवी संघाच्या मायदेशात सुरु असलेली 17 सामन्यांची विजयी मालिका देखील बांगलादेशने खंडित केली आहे.

इबादत हुसेनने कारकिर्दीतील सर्वोत्तम 6-46 अशी खेळी करून बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयात निर्णायक भूमिका बजावली. बांगलादेशने बुधवारी दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव केला आणि न्यूझीलंडमध्ये पहिला विजय मिळवला. किवी संघाने बांगलादेशला 40 धावांचे लक्ष्य दिले होते. मोमिनुल हकच्या नेतृत्वात बांगलादेश संघाने हे लक्ष्य 2 विकेट गमावून सध्य केले. कर्णधार मोमिनुल हक 13 आणि मुशफिकुर रहमान 5 धावांवर नाबाद राहिले. बांगलादेशचा न्यूझीलंडवर कोणत्याही फॉरमॅटमध्ये हा पहिला विजय ठरला आहे. या ऐतिहासिक विजयासह बांगलादेशने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (WTC 2023) मध्ये 12 गुण मिळवले आहेत. तसेच बांगलादेशने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 328 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने 458 धावा केल्या आणि किवीजवर 130 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात बांगलादेशी गोलंदाजांनी किवी फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आणि संपूर्ण संघाला 169 धावांत गुंडाळले.

SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) मध्ये बांगलादेशचा हा पहिला कसोटी विजय आहे. यापूर्वी, बांगलादेशने या चार देशांमध्ये 22 पैकी 21 कसोटी सामने गमावले होते, तर एक सामना रद्द झाला होता. उल्लेखनीय म्हणजे बांगलादेशने या देशांमध्ये चांगली कामगिरी केली, पण त्यांना कधीही विजय मिळवता आला नाही. तथापि बे ओव्हलच्या प्रत्येक सत्रात बांगलादेशने न्यूझीलंडवर सुरुवातीपासून वर्चस्व राखले.