
South Africa National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा दुसरा उपांत्य सामना 5 मार्च (बुधवार) रोजी लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता भारत आणि न्यूझीलंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना रंगणार आहे. त्याआधी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर 363 धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ 50 षटकात 312 धावा करु शकला.
One more flight to take ✈️
New Zealand are off to Dubai for the Champions Trophy final! pic.twitter.com/5EoO6TcizK
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 5, 2025
रचिन-विल्यमसनची शतकीय खेळी
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने 101 चेंडूत 108 धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून 13 चौकार आणि एक षटकार लागला. तर केन विल्यमसनने 94 चेंडूत 102 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि दोन षटकार मारले. शेवटी, डॅरिल मिशेलने 37 चेंडूत 49 धावा केल्या आणि ग्लेन फिलिप्स 27 चेंडूत 49 धावा करून नाबाद राहिले. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
डेव्हिड मिलरचे स्फोटक शतक
लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही निराशाजनक होती आणि संघाला पहिला मोठा धक्का फक्त 20 धावांवर सहन करावा लागला. यानंतर, टेम्बा बावुमा आणि रॅसी व्हॅन डर ड्यूसेन यांनी मिळून डावाची सूत्रे हाती घेतली आणि संघाचा धावसंख्या 125 धावांपर्यंत पोहोचवली. दक्षिण आफ्रिकेचा संघ निर्धारित 50 षटकांत नऊ गडी गमावून केवळ 312 धावा करू शकला. दक्षिण आफ्रिकेसाठी, घातक फलंदाज डेव्हिड मिलरने सर्वाधिक 100 धावा केल्या. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, डेव्हिड मिलरने 67 चेंडूत 10 चौकार आणि चार षटकार मारले. डेव्हिड मिलर व्यतिरिक्त, रॅसी व्हॅन डर ड्यूसेनने 69 धावा केल्या.
मिचेल सँटनरने घेतल्या सर्वाधिक तीन विकेट्स
न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सँटनरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. मिचेल सँटनर व्यतिरिक्त मॅट हेन्री आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. आता चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रविवारी म्हणजेच 9 मार्च रोजी टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.