रिषभ पंत च्या फलंदाजीवर सतत उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांवर युवराज सिंह चा टीम इंडियावर हल्ला बोल, कोच आणि कर्णधाराला दिला 'हा' सल्ला
(Photo Credit: Getty)

टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याच्यावर टीकेचे सत्र काही थांबण्याचा नाव घेत नाही. आयसीसी विश्वचषक, वेस्ट इंडिज दौरा आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिका, पंतला स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक संधी दिल्या गेल्या. पण, एकाही संधीचा फायदा घेऊ शकला नाही. एकीकडे पंतवर चाहते आणि दिग्गजांनी टीकास्त्र सोडले आहे. सर्व कोणी पंतच्या चौथ्या क्रमांकावरील अयशस्वी फलंदाजीबद्दल बोलत आहे. शिवाय, कोच आणि कर्णधाराने देखील पंतला त्याची फलंदाजी सुधारवण्याची चेतावणी दिली आहे. अशा परिस्थितीत, सिक्सर किंग आणि माजी क्रिकेटपटू युवराज सिंह (Yuvraj Singh) त्याच्या समर्थानात आला आहे. युवराज म्हणाला की, पंतवर जास्त दबाव आणणे योग्य नाही आणि महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) एक दिवसात बनला नव्हता.  (IND vs SA 3rd T20I: Female फॅनने म्हटले 'I Love You' तर रिषभ पंत ने दिले असे रिअक्शन; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल)

दिल्लीमधील एका कार्यक्रमादरम्यान भारताचा माजी अष्टपैलू युवराज म्हणाला की, भारतीय संघ व्यवस्थापनाने पंतची विचार करण्याची पद्धत समजून त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी बाहेर काढण्यासाठी त्याच्याबरोबर काम केले पाहिजे. नुकत्याच संपुष्टात आलेल्या दक्षिण आफ्रिकाविरूद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेमध्ये पंतला केवळ 23 धावा करता आल्या. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला, तर मोहाली पंतने चार आणि बंगळुरूमध्ये 19 धावा केल्या. दोन्ही प्रसंगी पंतने आपली विकेट भेट म्हणून दिली. तर, वेस्ट इंडीज दौर्‍यावर त्याने दोन डावांमध्ये 20 धावा केल्या, तर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत फक्त 58 धावा केल्या.

भारताची मंडळी फळी कमकुवत आहे आणि त्यामुळे त्यांनी विश्वचषकमधील दोन सामने, पहिले इंग्लंडविरुद्ध साखळी फेरीत आणि नंतर न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनल. टीम इंडियाच्या मधल्या फळीने अगदी मोक्याच्या क्षणी निराश केले. धोनीने वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतल्याने पंतला संधी दिली. पण तेथे त्याने फलंदाजी आणि विकेटकिपिंगने निराश केले. पंतला सुरुवातीला धोनीचा पर्याय म्हणून पाहिले जात होते, परंतु त्यांच्या बेजबाबदार फलंदाजीमुळे संघाच्या चिंता वाढल्या आहेत. पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पंत संघात असणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.