Najam Sethi (Photo Credit - Twitter)

भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) मध्ये स्पर्धेतील सहभागाबाबत पाकिस्तानने (PAK) नवा वाद निर्माण केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष नजम सेठी (Najam Sethi) यांनी एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानी संघाच्या सहभागावर शंका उपस्थित केली आहे. सेठी म्हणाले की, वनडे विश्वचषकात संघाचा सहभाग सरकारच्या परवानगीवर अवलंबून असेल. तसेच बोर्डाने आयसीसीला पत्र लिहून या विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या सहभागाबाबत एकटा बोर्ड निर्णय घेऊ शकत नाही, असे म्हटले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांनी आगामी आशिया चषक हायब्रीड मॉडेलवर आयोजित करण्यास परवानगी दिल्यानंतर सेठी यांचे विधान आले आहे.

पीसीबीने आयसीसीला पत्र लिहिले आहे

नजम सेठी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नजम सेठी म्हणाले, "जोपर्यंत भारत आणि पाकिस्तानचा संबंध आहे तोपर्यत पीसीबी किंवा बीसीसीआय कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. फक्त दोन्ही देशांची सरकारेच याबाबत निर्णय घेऊ शकतात. हे आमचे सरकार आहे, जे निर्णय घेतात. जसे भारताचा प्रश्न येतो तेव्हा ते केव्हा आणि कुठे खेळायचे हे त्यांचे सरकार ठरवते. तसेच आम्ही एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घ्यायचा की नाही हे पाकिस्तान सरकार ठरवेल." (हे देखील वाचा: IND vs PAK Asia Cup 2023: आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान तीन वेळा येवु शकतात आमने-सामने, जाणून घ्या समीकरण)

निर्णय सरकारवर अवलंबून आहे

नजम सेठी पुढे म्हणाले, "आम्ही आयसीसीला पत्र लिहिले आहे की आम्ही हे विश्वचषक वेळापत्रक स्वीकारू किंवा नाकारू शकत नाही. आमच्या सरकारने या प्रकरणी निर्णय घ्यायचा आहे. आम्ही अहमदाबादमध्ये खेळू की नाही हे विचारण्यात काही अर्थ नाही." जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही जाणार आहोत की नाही हे आधी ठरवले जाईल, मग आम्ही कुठे जायचे हे सरकार ठरवेल. आमचा निर्णय या दोन महत्त्वाच्या अटींवर अवलंबून आहे.

अहमदाबाद येथे होणार आहे सामना 

हे लक्षात घ्यावे की आयसीसीचे सीईओ ज्योफ अल्लार्डिस आणि अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी गेल्या महिन्यात पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांना एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी कोणतीही अट ठेवू शकत नसल्याचे स्पष्ट केले होते. सेठी म्हणाले की, आम्ही आयसीसीलाही कळवले आहे की आमच्या सरकारने आम्हाला परवानगी दिली तरच आम्ही भारतात खेळायला जाऊ. सरकारची परवानगी नसेल तर आम्ही कसे जाऊ? 15 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. लीग टप्प्यात पाकिस्तानला पाच ठिकाणी खेळायचे आहे. 2016 च्या टी-20 विश्वचषकानंतर पाकिस्तानने भारताचा दौरा केलेला नाही.