प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

PoK League: भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) मधील सध्याच्या राजकीय तणावामुळे इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज मॉन्टी पानेसरने (Monty Panesar) वादग्रस्त काश्मीर प्रीमियर लीग (Kashmir Premier League) मधून माघार घेतली आहे. पनेसर म्हणाले की, काश्मीर प्रश्नावर दोन देशांमधील संघर्षाच्या दरम्यान तो स्वत:ला यामध्ये ठेवू इच्छित नाही आणि त्यामुळे त्याने पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमध्ये (Pakistan-Occupied Kashmir) आयोजित होणाऱ्या लीगमध्ये सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले. काश्मीर प्रीमियर लीग ही देशांतर्गत स्पर्धा आहे जी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) पीओकेमध्ये (PoK) आयोजित केली आहे आणि 06 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. “काश्मीर प्रश्नावरून भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावामुळे मी केपीएलमध्ये (KPL) सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मला यामध्ये पडायचे नाही, यामुळे मला अस्वस्थ वाटेल,” पनेसर यांनी एका ट्विटमध्ये म्हटले.

दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू हर्शेल गिब्स यांनी लीगमध्ये भाग न घेण्यासाठी बीसीसीआयने धमकी दिल्याचे सांगितल्यानंतर लीग सुरू होण्याआधीच भारतीय बोर्ड एका वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बीसीसीआयने या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि पीओके लीगमध्ये भाग घेणाऱ्यांना भविष्यात भारतातील कोणत्याही क्रिकेट उपक्रमात भाग घेण्यास बंदी घालणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकंच नाही तर बीसीसीआयने इतर मंडळांशी संपर्क साधून त्यांच्या खेळाडूंना केपीएलसाठी न पाठवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, बीसीसीआयने (BCCI) आयसीसीला पात्र लिहून यामध्ये लक्ष घालण्याची व या लीगला मान्यता न देण्याचे आवाहन केले असल्याचे वृत्त देखील समोर आले आहे.

दरम्यान, काश्मीर प्रीमियर लीगमध्ये एकूण सहा संघ खेळताना दिसतील ज्याला पीसीबीने मंजुरी दिली आहे आणि आयसीसी या प्रकरणात पाऊल टाकेल की लीग पुढे जाऊ देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पीओकेमधील मुझफ्फराबाद क्रिकेट स्टेडियम लीगचे सामने आयोजित केले जाणार आहेत. ESPNCricinfo मधील अहवालानुसार, बीसीसीआयने आयसीसीशी संपर्क साधला आहे आणि काश्मीरचा वादग्रस्त प्रदेश म्हणून आणि विवादित प्रदेशांवर अशा लीगला परवानगी देता येईल का यावर केंद्रित आहे.