Loksabha Election 2024: क्रिकेटपटू युवराज सिंह, अभिनेता अक्षय कुमार कमळाच्या चिन्हावर लढवणार निवडणूक? 'या' मतदारसंघातून मिळू शकते उमेदवारी

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. भाजपकडून (BJP) पहिल्या टप्प्यात तब्बल लोकसभेच्या 130 उमेदवारांची नावे जाहीर केली. या उमेदवारांच्या यादीमध्ये अनेक सेलिब्रिटी आणि खेळाडूंना संधी मिळणार असल्याची माहीती मिळत आहे. यामध्ये मोदी-शाहांकडून धक्कातंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Gautam Gambhir Political Update: गौतम गंभीर राजकारण सोडणार! भाजप अध्यक्षांनाही कळवले; क्रिकेट आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा)

आगामी निवडणुकीत भाजप भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहला उमेदवारी देऊ शकतात. युवराज सिंह पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतो. याशिवाय, बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारला भाजपकडून चंदिगड किंवा दिल्लीतील एखाद्या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाईल. तर भाजपच्या माजी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांना दक्षिण भारतामधील एखाद्या मतदारसंघातून निवडणुकीचे तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे.

दिल्लीत 29 फेब्रुवारीला भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीअंती भाजपच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी लवकरात लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची नावे असू शकतात. या प्रमुख नेत्यांशिवाय भाजपकडून काही सेलिब्रिटींना उमेदवारी  देण्याची शक्यता आहे.