Lanka Premier League 2020: आंद्रे रसेलची तुफान खेळी, लंकन प्रीमियर लीग सामन्यात ठोकले तिसरे वेगवान टी-20 अर्धशतक
आंद्रे रसेल (Photo Credits: Twitter)

Lanka Premier League 2020: वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज आंद्रे रसेलने (Andre Russell) इंडियन प्रीमियर लीगमध्ये चाहत्यांना निराश केले असले तरी श्रीलंकामध्ये सुरु असलेल्या लंकन प्रीमियर लीगमध्ये (Lankan Premier League) तुफान खेळीचे प्रदर्शन केले. शनिवारी खेळलेल्या सामन्यात विंडीजच्या फलंदाजाने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक झळकावले. टी-20 मधील हे तिसरे संयुक्त वेगवान अर्धशतक आहे. कोलंबो किंग्जकडून (Colombo Kings) खेळत रसेलने गाले ग्लेडिएटर्सविरुद्ध (Galle Gladiators) विक्रमाची नोंद केली. पावसामुळे बाधित झालेला सामना 20 ओव्हरवरून 5-5 ओव्हरचा खेळण्यात आला. कोलंबो किंग्जकडून प्रथम फलंदाजी करताना आंद्रे रसेल सलामीला आला आणि दमदार अर्धशतक झळकावले. अवघ्या 19 चेंडूत नाबाद 65 धावांची खेळी करत त्याने संघाला 96 धावसंख्या गाठून दिली. प्रत्युत्तरात ग्लेडिएटर्सला 2 विकेट गमावून 62 धावांपर्यंत मजल मारता आली. दनुष्का गुणथिलाकाने 15 चेंडूत 30 धावा केल्या. लंकन प्रीमियर लीगमध्ये कोलंबो किंग्जकडून डावाची सुरुवात करणाऱ्या रसेलने तुफानी डाव खेळला आणि 19 चेंडूत 65 धावांच्या नाबाद खेळीत 9 चौकार आणि 4 षटकार लगावले.

19 चेंडूंचा सामना करत रसेलने फक्त दोन चेंडू जाऊ दिले. तीन एकेरी घेतले आणि 1 चेंडूत 2 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात भारताच्या युवराज सिंहने 12 चेंडूत सर्वात वेगवान अर्धशतक लगावले आहेत. 2007 टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध युवीने आजवरची अतूट कामगिरी बजावली, तर टी-20 लीगमधील सर्वात वेगवान अर्धशतक वेस्ट इंडीजच्या क्रिस गेलच्या नावर आहे ज्याने देखील 12 चेंडूत विक्रमी कामगिरी केली आहे. याशिवाय इतक्याच चेंडूवर अर्धशतक ठोकण्याचा विक्रम हजरतुल्ला जाझाईच्या नावावर देखील आहे.

दरम्यान, ग्लॅडिएटर्सचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने टॉस जिंकून किंग्सना फलंदाजी करण्यास सांगितले आणि त्यांनी संधीचा फायदा घेत कोणत्याही सुधारित पाच-ओव्हरच्या सामन्यात सर्वाधिक धावसंख्या गाठली. 32 वर्षीय रसेलने मोहम्मद आमिरच्या पहिल्या ओव्हरमध्ये तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले आणि त्यानंतर दुसऱ्या असिता फर्नांडोच्या ओव्हरमध्ये एक षटकार आणि तीन चौकार लगावले. रसेल 11 चेंडूत 44 धावा केल्या होत्या आणि 12 चेंडूत अर्धशतक करण्यापासून एक षटकार दूर होता, पण त्याला आणखी दोन चेंडूची प्रतीक्षा करावी लागली.