केएल राहुल (Photo Credit: IANS)

किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यातील आयपीएलचा (IPL) सहावा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला आणि केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वातील पंजाबला पहिले फलंदाजी करण्यास सांगितले. आजच्या सामन्यात बेंगलोरविरुद्ध राहुलने एका विक्रमला गवसणी घातली. गुरुवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) 2000 धावांचा टप्पा गाठणारा राहुल सर्वात वेगवान भारतीय ठरला. भारताचा महान दिग्गज आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) माजी खेळाडू सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर असलेला आठ वर्ष जुना विक्रम राहुलने मोडला. राहुलने हा टप्पा 60 व्या डावात तर सचिनने हा टप्पा 63व्या डावात गाठला होता. 2018 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये प्रवेश केल्यापासून 28 वर्षीय राहुल अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. (KXIP vs RCB, IPL 2020: बेंगलोरने टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही टीमचा प्लेइंग इलेव्हन)

आरसीबीविरुद्ध सामन्यापूर्वी राहुलने 1998 धावा केल्या होत्या. आजच्या सामन्यात उमेश यादवने ओव्हरमधील अखेरच्या चेंडूवर चौकार मारून राहुलने आयपीएल कारकीर्दीत 2 हजार धावा पूर्ण केल्या. दरम्यान, सर्वात वेगवान 2000 धावांचा विक्रम राहुलचा सहकारी क्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आयपीएलमधील 48 व्या डावात हा टप्पा गाठला होता. त्याच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियन दिग्गज शॉन मार्श दुसर्‍या क्रमांकावर आहे. मार्शने हा विक्रम 52 डावात केला होता. या एलिट आता राहुलचा देखील समावेश झाला ज्याने 60 डावात विक्रमाची नोंद केली.

दुसरीकडे, किंग्ज इलेव्हन पंजाबपूर्वी राहुल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा भाग होता. राहुलने पंजाबकडून खेळत आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतकही ठोकले आहे. दुसरीकडे, आजच्या सामन्याबद्दल बोलायचे तर बेंगलोरने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी बेंगलोरने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला नाही, तर पंजाबने दोन बदल केले. पंजाबने जिमी नीशम आणि मुरुगन अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. पंजाबला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आपल्या पहिल्या आयपीएल सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. दिल्लीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात राहुलने नवीन विक्रम केला होता. त्या सामन्यात तो आयपीएलच्या इतिहासातील 5वा असा खेळाडू बनला आहे ज्याने कर्णधारपदी विकेटकीपिंग व डावाची देखील सुरुवात केली.