Team India Squad: बुमराह आणि हर्षल पटेलच्या पुनरागमनासह T20 विश्वचषक स्पर्धेतील टीम इंडियाच्या संघ निवडीबद्दल जाणून घ्या मोठ्या गोष्टी
Team India (Photo Credit - Twitter)

आयसीसी T20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022) साठी बीसीसीआयने (BCCI) भारतीय क्रिकेट संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघात धक्कादायक बदल झाले नसले तरी 15 सदस्यीय मुख्य संघ आणि चार स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत काही मनोरंजक गोष्टी आहेत. टीम इंडियासाठी चांगली बातमी म्हणजे जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल (Jasprit Bumrah and Harshal Patel) संघात परतले आहेत. दुखापतीमुळे दोघेही आशिया कप 2022 (Asia Cup 2022) मध्ये सहभागी होऊ शकले नव्हते. दोघांनी दुखापतीतुन सावरल्याने ते पुन्हा संघात पुनरागमन करण्यास तयार आहेत. दुसरीकडे, संजू सॅमसन (Sanju Samson) ना मुख्य संघात आहे ना स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत. त्यामुळे ऋषभ पंतला (Rishabh Pant) बीसीसीआयने पुन्हा संधी दिली आहे.

पहा T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.

राखीव खेळाडू

मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर

बुमराह आणि हर्षल परतले

आशिया चषकादरम्यान, टीम इंडियाकडे दर्जेदार वेगवान आक्रमणाची कमतरता होती, त्यामुळे बुमराह आणि हर्षलच्या पुनरागमनामुळे संघ व्यवस्थापनाची चिंता कमी झाली असावी. बुमराह आणि हर्षल यांना T20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसह सामन्यांचा सराव मिळेल, जेणेकरून दोघेही या मेगा स्पर्धेसाठी पूर्णपणे तयार होतील.

निवडकर्त्यांचा अर्शदीपवर विश्वास 

अर्शदीप सिंहने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले, मग ते आयपीएल असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट. अर्शदीपला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे आणि तो T20 विश्वचषकाच्या पुरुष संघाचा एक भाग झाला आहे. श्रेयस अय्यरला पुन्हा स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत ठेवण्यात आले आहे, तर संजू सॅमसनला संघात संधी नाही.

ऋषभ पंतला पुन्हा संधी

ऋषभ पंतचा अलिकडच्या काळात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चांगला रेकॉर्ड नाही, त्यामुळे त्याला बाहेर बसवण्याची टांगती तलवार होती, पण सध्या तो संघाचा भाग आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान पंतला पुन्हा फॉर्म मिळवण्यावर भर द्यावा लागणार आहे. निवड समितीच्या बैठकीत पंत किंवा दिनेश कार्तिक यापैकी एकाला घेण्याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे, कारण केएल राहुल विकेटकीपिंगही करू शकतो. अशा स्थितीत दोन यष्टिरक्षक फलंदाजांचा समावेश करणे थोडे कठीण वाटत होते. सध्या पंत आणि डीके हे दोघेही विश्वचषक संघाचा भाग आहेत. (हे देखील वाचा: Asia Cup 2022: भारतीय गोलंदाजाने घेतल्या सर्वाधिक विकेट, धावांच्या बाबतीत पाकिस्तानी क्रिकेटर पुढे)

सिनियरला संधी तर ज्युनियर स्टॅंडबाय मध्ये

आर अश्विन मुख्य संघात स्थान मिळवण्यासाठी पुढे गेला आणि रवी बिश्नोई मागे राहिला. बिश्नोई मात्र स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे. बिष्णोई यांना संधी मिळाल्यावर त्यांनी स्वत:ला सिद्ध केले, अशा परिस्थितीत बाहेर बसणे नक्कीच अडचणीचे आहे.

शमी परतला पण मुख्य संघात नाही

मोहम्मद शमीच्या नावाचीही बरीच चर्चा झाली होती. तो मुख्य संघाचा भाग असेल असे वाटत होते, परंतु सध्या तो स्टँडबाय खेळाडूंपैकी एक आहे. शमीचा अनुभव टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियात उपयोगी पडू शकतो. तो संघाचा भाग नसला तरी त्याच्या उपस्थितीमुळे युवा वेगवान गोलंदाजांना मदत होऊ शकते.