KKR vs RR, IPL 2020: नाईट रायडर्ससाठी धावला कर्णधार इयन मॉर्गन, कोलकाताचे रॉयल्सपुढे विजयासाठी 192 धावांचं तगडं आव्हान
इयन मॉर्गन (Photo Credit: Twitter/IPL)

KKR vs RR, IPL 2020: राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) टॉस जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) पहिले फलंदाजी करण्यास सांगितले. अशा स्थितीत केकेआरने पहिले फलंदाजी करत कर्णधार इयन मॉर्गनच्या (Eoin Morgan) नाबाद अर्धशतकाच्या बळावर 191 धावांपर्यत मजल मारली आणि राजस्थानपुढे विजयासाठी धावांचं मोठं 192 आव्हान ठेवलं. दोन्ही संघांना आजच्या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे असताना केकेआरच्या (KKR) आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केल्याने कर्णधार मॉर्गन त्यांच्या मदतीला धावला आणि त्याने संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. 'करो या मरो'च्या आजच्या सामन्यात केकेआरकडून मॉर्गन वगळता राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) 39, सलामी फलंदाज शुभमन गिलने 36 आणि दुखापतीतून सावरलेल्या आंद्रे रसेलने 25 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, राजस्थानच्या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी केली. राजस्थानसाठी राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर कार्तिक त्यागीने 2, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (CSK vs KXIP, IPL 2020: रुतुराज गायकवाडने गोड केला सुपर किंग्सचा शेवट, चेन्नई 9 विकेटने विजयी; किंग्स इलेव्हनसाठी प्ले ऑफचा दरवाजा बंद)

आजच्या सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्याच चेंडूवर आर्चरने नितीश राणाला भोपळा न फोडता माघारी धाडलं. त्यानंतर गिल आणि राहुल त्रिपाठीने डाव सावरला, पण तेवतिया शुभमनला जोस बटलरकडे कॅच आऊट करत मोठे यश मिळवून दिले. तेवतिया याच ओव्हरमध्ये सुनील नारायणही शून्यावर बाद झाला. राहुल त्रिपाठीला श्रेयस गोपालने 39 धावांवर रॉबिन उथप्पाकडे कॅच आऊट केलं. रसेल 11 चेंडूंत 25 धावांवर बाद झाला. त्यानंतर मॉर्गन आणि पॅट कमिन्सने डेथ ओव्हरमध्ये मोठे फटके मारले आणि कोलकाताची धावसंख्या 190 पार नेली. कमिन्स 15 धावा करून माघारी परतला. मॉर्गन 68 धावांवर नाबाद परतला.

दुसरीकडे, आजच्या सामन्यासाठी राजस्थान संघात कोणताही बदल झाला नाही, तर कोलकाता संघात दोन बदल दिसले. कोलकाताने लोकी फर्ग्युसन आणि रिंकू सिंह यांना बाहेर केले असून त्यांच्या जागी आंद्रे रसेल आणि शिवम मावी यांचा समावेश केला आहे.