CSK vs KXIP, IPL 2020: रुतुराज गायकवाडने गोड केला सुपर किंग्सचा शेवट, चेन्नई 9 विकेटने विजयी; किंग्स इलेव्हनसाठी प्ले ऑफचा दरवाजा बंद
रुतुराज गायकवाड(Photo Credit: Twitter/PTI)

CSK vs KXIP, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 53व्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने (Kings XI Punjab) पहिले फलंदाजी करत दिलेल्या 154 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) 9 विकेट आणि 7 चेंडू शिल्लक असताना दणदणीत विजय मिळवला. प्ले ऑफ शर्यतीतून यापूर्वीच बाहेर पडलेल्या सीएसकेचा (CSK) 14 सामन्यांपैकी सहावा आणि सलग तिसरा विजय असून ते गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहचले आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएलच्या 13व्या हंगामातील अंतिम सामना होता. त्यामुळे रुतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) विजय मिळत संघाचा शेवट गोड केला. रुतुराजने सर्वाधिक नाबाद 62 धावा, फाफ डु प्लेसिसने 48 आणि अंबाती रायुडूने (Ambati Rayudu) नाबाद 30 धावांचे योगदान दिले. दरम्यान, किंग्स इलेव्हन पंजाबला आजच्या सामन्यातील पराभवाने मोठा फटका बसला असून त्यांच्यासाठी प्ले-ऑफचा दरवाजा बंद झाला आहे. पंजाबचा 13 सामन्यातील हा आठवा पराभव असून ते 12 पॉईंट्ससह पाचव्या स्थानावर बसले आहेत. प्ले ऑफमध्ये आजवर प्रवेश मिळवणारा मुंबई इंडियन्स एकमेव संघ आहे, तर अन्य तीन जागांसाठी बेंगलोर, दिल्ली, हैदराबाद, कोलकता आणि राजस्थान यांच्यात स्पर्धा पाहायला मिळत आहे. (IPL 2020: एमएस धोनीचा Yellow जर्सीत आजचा शेवटचा सामना आहे का? CSK कर्णधाराने EPIC प्रतिक्रिया देत केली बोलती बंद)

दरम्यान, पंजाबने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईसाठी फाफ डु प्लेसीसी आणि रुतुराज गायकवाडने दमदार सुरुवात केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी झाली. डु प्लेसिसचे अर्धशतक अवघ्या दोन धावांनी हुकले. क्रिस जॉर्डनने त्याला विकेटकीपर केएल राहुलकडे 48 धावांवर कॅच आऊट केले. त्यानंतर रुतुराज आणि रायुडूने आपली विकेट सांभाळून खेळत संघाला यंदाच्या स्पर्धेत अंतिम विजय मिळवून दिला. सलग तिसऱ्यांदा सीएसकेकडून युवा फलंदाज रुतुराज गायकवाडने अर्धशतकी खेळी केली आणि टीमच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. रायुडूने त्याला चांगली साथ दिली आणि धावांवर नाबाद परतला.

दुसरीकडे, यापूर्वी पहिले फलंदाजी करणाऱ्या पंजाबचे दिग्गज फलंदाज बॅटने अपयशी ठरल्यावर दीपक हुडाने नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. हुडा 30 चेंडूत 62 धावांवर नाबाद राहिला. पंजाबने 72 धावांवर 4 विकेट गमावले असताना हुडा एका बाजूने लढा देत राहिला आणि संघाला 153 धावांपर्यंत मजल मारून दिली.