एमएस धोनी (संग्रहित संपादित प्रतिमा)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघातून निवृत्ती घेतल्यानंतर, महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) नक्की काय करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आता याबाबत एमएस धोनीची एक योजना समोर येत आहे. भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार कॅप्टन कूल आता कडकनाथ (Kadaknath) कोंबडीचे फार्मिंग करणार आहे. धोनी त्याच्या रांचीच्या फार्महाऊसवर कडकनाथ कोंबडी पालन करण्याची योजना आखत आहे. यासाठी माहीने झाबुआ (Jhabua) येथील एका शेतकऱ्याशी संपर्क साधून 2 हजार पिलांची ऑर्डर दिली आहे.

मध्य प्रदेशातील एका पोल्ट्री फार्मला ही ऑर्डर देण्यात आली असून, ती पूर्ण करण्यास 15 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी पोल्ट्री फार्म खूप प्रयत्न करीत आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, झाबुआ जिल्ह्यातील थंडला ब्लॉकमध्ये राहणारे विनोद मेधा यांना ही ऑर्डर देण्यात आली आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी धोनीच्या फॉर्म मॅनेजरने त्यांच्याशी संपर्क साधला होता आणि पाच दिवसांपूर्वी त्यांना 2000 कडकनाथ पिल्लांची ऑर्डर देण्यात आली. ही ऑर्डर त्यांना 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे. आहे. याबाबतचे पेमेंटही आधीच करण्यात आले आहे. (हेही वाचा: आयपीएलच्या पुढच्या पर्वात आणखी एका नव्या संघाची भर पडण्याची शक्यता, नवव्या संघासाठी BCCI तयारी करत असल्याचे वृत्त)

भारतातील नामांकित क्रिकेटपटूंपैकी एक असलेला धोनी याला कडकनाथ कोंबडीचा पुरवठा करीत असल्याचा मेधा यांना अभिमान आहे. कडकनाथ कोंबडा ही मध्य प्रदेशातील झाबुआची ओळख आहे. त्याला झाबुआचा कडकनाथ म्हणून भारत सरकारकडून जीआय टॅगही मिळाला आहे. हा कोंबडा काळा रंग, काळे रक्त, काळी हाडे आणि काळ्या मांसासह त्याच्या चवदार चवीसाठी ओळखला जातो. या कोंबड्यामध्ये फार कमी चरबी आणि कोलेस्ट्रॉल आढळते. यासह यामध्ये प्रथिनांची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते. आता धोनी अशा प्रकारच्या कोंबड्या पाळणार आहे,

दरम्यान, जुलै 2020 मध्ये काही फोटो आणि रिपोर्ट्स समोर आले होते, ज्यामध्ये म्हटले होते की, धोनी आपल्या 43 एकरातील फार्महाऊसमध्ये सेंद्रिय शेती करण्याचा विचार करीत आहे. सोबतच धोनीच्या टीमने डेअरीसाठी साहीवाल जातीच्या गायी पाळल्या आहेत. त्या ठिकाणी मासे पालनही केले जात आहे आणि त्याच बरोबर बदके आणि कोंबडी पालन देखील या ठिकाणी होत आहे.