IPL 2021: आयपीएलच्या पुढच्या पर्वात आणखी एका नव्या संघाची भर पडण्याची शक्यता, नवव्या संघासाठी BCCI तयारी करत असल्याचे वृत्त
(Photo Credits: IPL)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) चे 13 पर्व नुकतेच संपले. कोरोना व्हायरस संसर्गाचे सावट असल्याने यंदाची आयपीएल स्पर्धा (IPL 2020) भारताबाहेर पार पडली. आयपीएल 2020 चा धुरळा अद्याप खाली बसायचा आहे तोपर्यंतच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Board of Control for Cricket in India) अर्थातच बीसीसीआय (BCCI) आयपीएल 2021 ची तयारी करण्याच्या कामाला लागली आहे. दरम्यान, आयपीएल 2021 मध्ये आणखी एका नव्या संघाची भर पडण्याची शक्यता आहे. होय, नवव्या संघासाठी बीसीसीआय तसे नियोजन करत असल्याचे वृत्त आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यात नव्या संघाचा समावेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच बीसीसीआय पूर्ण ऑक्शन करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये एकण 8 संघ खेळत आले आहेत. जर लीगमध्ये 9 व्या संघाचा समावेश झाला तर बऱ्याच गोष्टी बदलताना दिसू शकतात. तसेच, आयपीएलमधील समन्यांची संख्याही वाढू शकते. अद्याप बीसीसीआयकडून अधिकृतपणे याबाबत काहीच सांगण्यात आले नाही. परंतू, क्रीडा वर्तुळात नवव्या संघाची चर्चा मात्र जोरदार सुरु आहे.

आतापर्यंतचा इतिहास पाहता आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव आणि संघ निवड ही साधारण डिसेंबर महिन्यात पार पडत आली आहे. परंतू, कोरोना व्हायरस संकट पाहता यंदा ही प्रक्रिया काहीशी विलंबाने सुरु होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे अध्यश्र सौरव गांगूली यानी या आधीही तसे संकेत दिले आहेत. (हेही वाचा, IPL 2020 Expensive Players Who Flopped: करोडो रुपये देऊन संघात घेतलेले 'हे' 5 खेळाडू आयपीएल 2020 मध्ये ठरले सुपर फ्लॉप)

दरम्यान, आयपीएल 2021 पर्व मार्च आणि एप्रील महिन्यात खेळले जाईल. त्यामुळे खेळाडूंचा लिलाव करण्यासाठी फार वेळ उरला नाही. 'द हिंदू'ने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएल लिलाव नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी 2021 मध्ये होण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षी कोरोना व्हायरस संकटामुळे आयपीएल युएईमध्ये खेळला गेला.