IPL 2022 New Teams: आयपीएलमध्ये दोन नव्या संघांच्या लिलावाची प्रतीक्षा लांबणीवर, BCCI अधिकाऱ्याने सांगितले हे कारण
आयपीएल (Photo Credit: Twitter/IPL)

भारतीय क्रिकेट बोर्ड पुढच्या वर्षाच्या आवृत्तीआधी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) दोन नव्या फ्रँचायझींचा समावेश करण्याच्या विचारात आहे. तथापि, प्रक्रिया अद्याप सुरू आहे आणि त्यासाठी बाजारपेठेचे विश्लेषण तसेच व्यवहार्यता आवश्यक आहे, असे बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. “आम्ही पुढच्या वर्षाच्या आयपीएलमध्ये दोन फ्रँचायझी मिळविण्याचा विचार करीत आहोत पण आम्हाला बाजारपेठ पाहावी लागेल आणि देशातील सध्याच्या परिस्थितीचे परीक्षण करावे लागेल. आम्ही टाइमलाइनची हमी देऊ शकत नाही कारण आपल्याकडे बर्‍याच गोष्टींचा विचार करायचा आहे,” भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कोषाध्यक्ष अरुण धूमल यांनी IANS ला सांगितले. (BCCI AGM 2020: 10-संघीय IPL ला मान्यता, बीसीसीआय एजीएम बैठकीत 2028 ऑलिंपिक खेळात क्रिकेटच्या समावेशावरही घेतला मोठा निर्णय)

अहमदाबाद एका फ्रँचायझी असू शकते अशी चर्चा रंगली आहे तथापि, कोणतीही नवीन फ्रँचायझी देण्याचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी निविदा प्रक्रिया चालू करावी लागेल. आयपीएल 2021 चा हंगाम 60 पैकी 29 सामने खेळण्यानंतर आठपैकी चार फ्रँचायझींमध्ये कोविड-19 प्रकरणे समोर आल्यानंतर स्थगित करण्यात आला होता तर उर्वरित भाग 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) पुढील वर्षाच्या अगोदर मेगा लिलावाची योजना आखत आहे. तीन रिटेन्शन्स आणि दोन राईट-टू-मॅच (आरटीएम) पत्ते वगळता एका मेगा लिलावात, सर्व खेळाडूंवर बोली लावली जाईल.

तसेच जर दोन फ्रॅन्चायजी जोडल्या जाणार असतील तर तेथे नक्कीच एक मोठा लिलाव करावा लागेल. यात अतिरिक्त सामने आणि विस्तीर्ण विंडो समाविष्ट असेल पण बीसीसीआयला थांबून पहायचे आहे. 2014 पासून टी-20 स्पर्धा आठ संघांसह खेळली जात आहे. म्हणजे, सर्वकाही सुरळीत पार पडल्यास पुढील वर्षापासून 10 कर्णधारांमध्ये विजेतेपदासाठी सामना होणार आहे. शिवाय, नवीन संघ जोडल्यामुळे काय परिणाम होतात हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या बीसीसीआयला यंदाच्या आयपीएल हंगामाचे सामने पुन्हा आयोजित केले आहेत. आयपीएलचे एकूण 31 सामने शिल्लक आहेत.