BCCI AGM 2020: 10-संघीय IPL ला मान्यता, बीसीसीआय एजीएम बैठकीत 2028 ऑलिंपिक खेळात क्रिकेटच्या समावेशावरही घेतला मोठा निर्णय
आयपीएल 2020 ट्रॉफी (Photo Credit: Instagram/iplt20)

बीसीसीआय एजीएमची (BCCI AGM) सध्या अहमदाबाद येथे सुरु आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (BCCI) या बैठकीत काही मोठे निर्णय घेण्यात आले आहे. आजच्या बैठकीत 10 संघीय आयपीएल (IPL) 2022 च्या योजनेला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. आयपीएलमधील नवीन दोन संघांसाठी अदानी ग्रुप आणि गोयंका शर्यतीत आहेत. यापैकी एक संघ अहमदाबादचा असून तो अदानी ग्रुप खरेदी करण्याची शक्यता आहे. दुसऱ्या संघासाठी कानपुर, लखनौ आणि पुणे या नावांची चर्चा आहे. संजीव गोयंका ग्रुपने यापूर्वी 2016 आणि 2017 आयपीएलमध्ये राइजिंग पुणे सुपरजायंट्स संघ मैदानावर उतरवला होता. आयपीएलमध्ये 10 संघांच्या समावेशाने सामन्यांची संख्या वाढून 94 होईल ज्यामुळे स्पर्धेचा कालावधीही वाढेल. PTI ला मिळालेल्या माहितीनुसार दुसर्‍या एका महत्त्वाच्या घडामोडीत, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून काही स्पष्टीकरण मिळाल्यानंतर 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये टी-20 क्रिकेटच्या समावेशासाठी आयसीसीच्या (ICC) निर्णयाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. (IPL 2021: आयपीएलच्या 14व्या हंगामात किती संघ खेळताना दिसणार? महत्वाची माहिती आली समोर)

"2022 च्या आयपीएलमध्ये दोन नवीन संघ सामील केले जातील," बोर्डाच्या एका सूत्रांनी PTI ला सांगितले. तसेच, कोविड-19 मुळे सर्व प्रकारच्या प्रथम श्रेणीतील पुरुष आणि पुरुष दोघांनाही घरगुती हंगामासाठी योग्य मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात सय्यद मुश्ताक अली टी-20 चॅम्पियनशिपसह अनेक महिन्यांच्या विलंबानंतर बीसीसीआयची स्थानिक हंगाम सुरू करण्याची योजना आहे. अन्य निर्णयांनुसार, कॉंग्रेसचे दिग्गज नेते राजीव शुक्ला यांची उत्तराखंडमधील माहिम वर्मा यांच्याऐवजी मंडळाच्या उपाध्यक्षपदी अधिकृतपणे नेमणूक करण्यात आला आहे. सर्वसाधारण समितीने सौरव गांगुलीचे नाव आयसीसीत बोर्डाचे संचालक म्हणून कायम ठेवणार असल्याचेही समजले आहे. चिटणीस जय शाह हे वैकल्पिक संचालक तसेच मुख्य कार्यकारी समितीतील भारताचे प्रतिनिधी म्हणून काम करणार आहेत.

दुसरीकडे, आयसीसी टी-20 वर्ल्ड कप आणि वनडे वर्ल्ड कप आयोजित करण्यासाठी बीसीसीआयचे सचिव व कोषाध्यक्ष कर माफीवर सरकारशी बोलणार असल्याचं म्हटलं आहे. भारतात 2021 मध्ये टी-20 आणि 2023 मध्ये वनडे वर्ल्ड कपचे आयोजन केले जाणार आहे.