IPLमध्ये संघांची संख्या वाढणार, अदानी-टाटा नवीन संघ विकत घेण्याच्या तयारीत
Representational Image |(Photo Credit-Facebook)

यंदाच्या आगामी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (Indian Premier League) (आयपीएल (IPL)) पुन्हा एकदा 10 संघ दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयोजक आगामी स्पर्धेच्या कक्षा रुंदावण्याच्या तयारीत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय (BCCI) ने आयपीएलमधील संघांची संख्या 8 वरून 10 करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. टाईम्स ऑफ इंडिया (Times of India) या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने आयपीएलमध्ये संघांची संख्या वाढवण्यासाठी ब्लू प्रिंट तयार केले आहे. '' योजना तयार आहे आणि संघ संख्या वाढवण्याचा निर्णय पक्का आहे. पण, याची टेंडर प्रक्रिया कशी राबवावी याबाबत चर्चा सुरू आहे. आयपीएलच्या पुढील हंगाम दहा संघांमध्ये खेळवला जाईल अशी आशा आहे,''असे सूत्रांनी सांगितले. (कोलकाता नाईट रायडर्स जॅक कॅलिस आणि सायमन कॅटिच यांना डच्चू, प्रशिक्षक पदांवरून हकालपट्टी)

दुसरीकडे, टाटा (Tata) (रांची, जमशेदपूर), अदानी ग्रुप (Adani Group) (अहमदबाद) आणि आरपीजी संजीव गोयंका (Sanjiv Goenka) (पुणे) यांनी दोन संघासाठी आपली पसंती दर्शवली आहे. याआधी, 2010 च्या आयपीएलमध्ये 10 संघाचा फॉर्म्युला आजमावला गेला होता पण नंतर वाद निर्माण झाल्याने हा फॉर्मुला रद्द केला गेला होता.

संघमालक आणि बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी यांच्यामध्ये मागील आठवड्यात लंडनमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत नवीन संघ स्पर्धेत आल्यास बीसीसीआयला याचा फायदा होईल यावर सर्व एकमत आहे. मात्र दोन नवीन संघासाठी अधिकृत पद्धतीने निवीदा काढून बोली लावण्याची प्रक्रिया करण्यास काही कालावधी जाऊ शकतो त्यामुळे 2021 पर्यंत दोन नवीन संघ आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतात, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.