Shreyas Iyer: KKR कर्णधार श्रेयस अय्यर याच्यावर BBCI ची कारवाई, राजस्थानविरुद्धच्या सामन्यात केलेली चूक भोवली
श्रेयस अय्यर (Photo Credit: Twitter/IPL)

इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 2 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. कोलकाताला या सामन्यातील शेवटच्या चेंडूवर पराभवाचा धक्का तर बसलाच, पण आता कर्णधार श्रेयस अय्यरवरही (KKR Captain Shreyas Iyer) मोठी कारवाई करण्यात आली आहे. या सामन्यात कोलकाता संघाकडून निर्धारित वेळेत षटके पूर्ण करण्यात न आल्याने बीसीसीआयकडून (BCCI) श्रेयस अय्यरला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (हेही वाचा -  GT VS DC, IPL 2024 Head to Head: गुजरात आणि दिल्ली यांच्यात चुरशीचा आयपीएल सामना, आकडेवारीत कोण कुणावर वरचढ? घ्या जाणून)

आयपीएलच्या आचार संहितेतील षटकांच्या गतीबाबतच्या नियमाचा भंग करण्याची ही कोलकाता नाईट रायडर्स संघाची पहिलीच वेळ आहे. त्याचमुळे यावेळी कर्णधार श्रेयस अय्यरवर 12 लाखांचा दंड ठोठावण्याच आला आहे. आयपीएलच्या नियमानुसार षटकांची गती कमी राखल्याची चूक संघाकडून पहिल्यांदा झाल्यास कर्णधारावर 12 लाखांचा दंड आकारला जातो. तसेच दुसऱ्यांदा अशी चूक झाल्यास कर्णधारावर 24 लाखांचा आणि संघातील इतर खेळाडूंवरही 6 लाख किंवा सामना शुल्कातील 25 टक्के, जी रक्कम कमी असेल, तो दंड ठोठावला जातो.

दरम्यान, आयपीएल 2024 मध्ये अशी कारवाई होणारा श्रेयस पहिलाच कर्णधार नाही, यापूर्वी शुभमन गिल, ऋषभ पंत या कर्णधारांवरही ही कारवाई झाली आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 223 धावा केल्या होत्या. कोलकाताकडून सुनील नारायणने 56 चेंडूत 109 धावांची खेळी केली. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 224 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. राजस्थानकडून जॉस बटलरने 60 चेंडूत 107 धावांची नाबाद खेळी केली.