IPL 2022, MI vs KKR Match 14: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 15 च्या 14 व्या सामन्यात पाच वेळा माजी चॅम्पियन मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) एकावेळी सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. तथापि केकेआरकडून (KKR) हंगामातील पहिला सामना खेळणारा पॅट कमिन्स (Pat Cummins) याने आपल्या वादळी खेळीने संपूर्ण डाव बदलला कमिन्स आला आणि मुंबईविरुद्ध कहर करून गेला. कोलकाताने हा सामना 5 विकेटने जिंकला तर मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव ठरला आहे. टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या मुंबईचे खेळाडू दबावात खेळत असल्याचे जाणवून आले. या सामन्यात मुंबईने तीनही विभागात आपले निराशाजनक प्रदर्शन केले. केकेआरविरुद्ध पराभवाने मुंबईची सर्वात कमजोर बाजू आता स्पष्टपणे सर्वांसमोर आली आहे. (IPL 2022: रोहित शर्मा त्याच्या आवडत्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध हतबल, आतापर्यंत MI कर्णधारने उभारलाय धावांचा डोंगर)
कोलकाताविरुद्ध खराब फलंदाजी आणि गचाळ फिल्डिंग मुंबईच्या पराभवाचे मुख्य कारण आहे. टॉस गमावून फलंदाजीला आलेल्या मुंबईचे तीन फलंदाज अवघ्या 55 धावसंख्येवर पॅव्हिलियनमध्ये परतले. कर्णधार रोहित शर्मा याने हंगामाच्या सुरुवातीला अर्धशतकी खेळी करून सुरुवात केली, राजस्थान आणि कोलकाताविरुद्ध त्याची बॅट शांतच राहिली. विशेष म्हणजे दोन्ही वेळी रोहित आपला आवडता शॉट खेळून बाद झाला. त्यानंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असणारा ईशान किशनही संघाला अडचणीच्या परिस्थितीतून बाहेर करण्यात अपयशी ठरला. दक्षिण आफ्रिकेचा अंडर-19 स्टार डेवाल्ड ब्रेविस याने येताच फटकेबाजी केली, पण चांगल्या सुरुवातीचे तो मोठ्या खेळीत रूपांतर करू शकला नाही. यामुळे मधल्या फळीवर दडपण वाढले. याशिवाय सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा देखील केकेआर गोलंदाजांवर सुरुवातीला वर्चस्व मिळवू शकले नाही. तर किरॉन पोलार्ड अंतिम क्षणी फलंदाजीला आल्याने संघाला त्याचा अधिक फायदा होऊ शकला नाही. परिणामी संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही.
याशिवाय, सन्मानजनक धावसंख्येचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईने नियमित अंतराने विकेट घेतल्या, पण त्यांचे गोलंदाज आवश्यक दबाव पाडू शकले नाही. बसिल थंपी याने तीन षटकांत 20 धावा दिल्या असल्या तरी तो विकेट घेण्यात अपयशी ठरला. तसेच डॅनियल सॅम्स याने तीन षटकांत एक विकेट घेऊन सर्वाधिक 50 धावा लुटल्या. उल्लेखनीय आहे की पॅट कमिन्सने सॅम्स च्या डावातील 16 व्या षटकांत 35 धावा काढल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. लक्षात घ्यायचे की गेल्या काही हंगामाप्रमाणे मुंबईची गोलंदाजी पेपरवर खतरनाक दिसत असली तरी मैदानात ती प्रभाव पाडण्यात अपयशी ठरत आहे. तसेच त्यांना आपल्या क्षेत्ररक्षणात देखील मोठे सुधार करण्याची गरज आहे.