IPL 2022, MI vs CSK: मुंबई इंडियन्स खराब करणार ‘सुपर किंग्स’चा खेळ, चेन्नईसाठी ‘आर या पार’च्या लढतीत ‘हे’ 11 धुरंधर उतरवणार मैदानात!
MS Dhoni and Rohit Sharma. (Photo Credits: IANS)

IPL 2022, MI vs CSK: गुरुवारी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे. आयपीएल प्लेऑफच्या (IPL Playoffs) दृष्टीने दोन्ही संघातील हा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. या सामन्यातून एमएस धोनी (MS Dhoni) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधार म्हणून पुन्हा आमनेसामने येतील. रोहित शर्माची मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे, तर सीएसकेच्या (CSK) आशा गणितीदृश्या अजूनही कायम आहेत. आतापर्यंत मुंबईची ‘पलटन’ 10 पैकी फक्त दोनच सामने जिंकू शकली तर चेन्नईने 11 पैकी चार सामने खिशात घातले आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात मुंबईवर दुसऱ्यांदा मात करून चेन्नई प्लेऑफच्या दिशेने आगेकूच करू इच्छित असेल. तर मुंबई गेल्या सामन्यातील पराभवाचा बदल घेत सीएसकेच्या आशेवर पाणी फेरण्याच्या निर्धारित असेल. आणि या साठी मुंबईने तगडे प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवण्याची गरज आहे. (IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या ‘सर्वात महागडा’ फलंदाजांची झोप उडाली; रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा ‘हा’ सल्ला आला कामी)

रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल न करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि चेन्नईविरुद्ध देखील असेच अपेक्षित आहे. मुंबईने गेल्या सामन्यात दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या सूर्यकुमार यादवच्या जागी रमनदीप सिंहचा समावेश केला होता. आणि चेन्नईविरुद्ध देखील ते रमनदीपला आणखी एक संधी देण्याची शक्यता आहे. याशिवाय ईशान किशन आणि कर्णधार रोहित पुन्हा एकदा सलामीला उतरतील. मुंबईला विजयाच्या रुळावर परतण्यासाठी या दोन स्टार खेळाडूंचे अधिक वेळ खेळपट्टीवर खेळणे गरजेचे आहे. याशिवाय मधल्या फळीत तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड आणि टिम डेविड बॅटने जबाबदार घेतील. तिलकने या हंगामात मुंबईसाठी प्रभावी फलंदाजी केली मात्र, तो सातत्य राखण्यात अपयशी ठरला आहे. तसेच संघाचा दिग्गज अष्टपैलू किरॉन पोलार्ड अपेक्षा पूर्ण करू शकलेला नाही. त्यामुळे टीमचा ज्येष्ठ खेळाडू म्हणून पोलार्डला पुढाकाराने खेळणे गरजेचे आहे. दुसरीकडे, गोलंदाजी विभागात आनंदाची बातमी म्हणजे जसप्रीत बुमराह गेल्या सामन्यातून लयीत परतला आहे. डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, आणि रिले मेरेडिथ यांनी नियमीत अंतराने योगदान दिले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून बुमराहला योग्य साथ देण्याची अपेक्षा कर्णधार रोहितला असेल.

मुंबई इंडियन्स संभावित प्लेइंग 11 - रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, टिम डेविड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह आणि रिले मेरेडिथ.