IPL 2022, MI vs CSK: 15व्या पर्वात मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर उनाडकटने गोलंदाजांना केले खास आवाहन, सांगितला विजयाचा गेम प्लॅन
मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs CSK: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super King) टी-20 चॅम्पियनशिपमधील दोन सर्वात यशस्वी संघ आहेत, ज्यांनी अनुक्रमे पाच आणि चार विजेतेपद जिंकले आहेत. मुंबईतील डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे गुरुवार, 21 एप्रिल रोजी दोन्ही संघ या वर्षी प्रथमच आमनेसामने येणार आहेत. मुंबई आणि चेन्नईमध्ये आतापर्यंत 34 वेळा सामना झाला आहे. MI ने 20, तर सुपर किंग्सने 14 सामने खिशात घातले आहे. मात्र, आतापर्यंत मुंबई आयपीएल 2022 (MI IPL 2022) मध्ये पिछाडीवर पडली आहे. त्यांनी खेळलेल्या सहा सामन्यात पराभव पत्करला आहे. त्यामुळे प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी प्रत्येक फ्रँचायझीने त्यांच्या 14 पैकी किमान आठ सामने जिंकले पाहिजेत. यावर संघाचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) म्हणतो की आम्ही प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकू की नाही यावर अधिक विचार करण्याची ही योग्य वेळ नाही. सध्या संघाला संघ म्हणून संघटितपणे खेळण्याची गरज आहे. (IPL 2022, MI vs CSK: चेन्नईविरुद्धच्या हायवोल्टेज सामन्यापूर्वी Jasprit Bumrah घेतोय विशेष प्रशिक्षण, व्हिडिओ पाहून चेन्नईच्या फलंदाजांना फुटेल घाम)

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईची गोलंदाजी पूर्णपणे जसप्रीत बुमराहवर अवलंबून आहे. दुसरा कोणताही गोलंदाज त्याला साथ देण्यात आतापर्यंत अपयशी ठरला आहे. अशा परिस्थितीत संघाला सतत पराभवाचा सामना करावा लागत आहे. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत उनाडकट म्हणाला, “सामूहिक प्रयत्नांची गरज आहे आणि आम्हाला त्यावर भर द्यायला हवा. आपल्या चुकांमधून धडा घेऊन आपण अधिक चांगले करू. आमच्या काही गोलंदाजांनी काही चांगली षटके टाकली आहेत पण एक युनिट म्हणून आम्ही चांगली कामगिरी केली नाही. आम्ही एक युनिट म्हणून चांगले कसे खेळायचे याबद्दल बोललो आहोत. डेथ ओव्हर्स किंवा पॉवरप्लेमध्ये नवीन काहीही नाही, हे सर्व एक युनिट म्हणून चांगल्या कामगिरीबद्दल आहे.”

प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मुंबईला आता उर्वरित आठ सामने जिंकावे लागतील, परंतु उनाडकटने सांगितले की तो फार पुढे पाहत नाही. तो म्हणाला, “इतका पुढचा विचार करण्याची गरज नाही. आम्हाला सामन्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि आमची कामगिरी सुधारावी लागेल. एकदा असे झाले की सर्व काही ठीक होईल. सध्या एक विजय आणि दोन गुणांसह खाते उघडणे महत्त्वाचे आहे.” दरम्यान चेन्नईविरुद्धच्या त्यांच्या आगामी सामन्यापूर्वी, उनाडकटने मानले की दोन्ही संघ वरचा हात घेण्यासाठी एकमेकांना चुरशीची लढत देतील. “प्रत्येकाला माहित आहे की MI आणि CSK हे सर्वात यशस्वी संघ आहेत. बाहेरून, हे कदाचित TATA IPL चा एल क्लासिको आहे. दोन्ही संघ कठोर लढा देतील आणि ही एक चांगली स्पर्धा असेल,” उनाडकटने बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.