IPL 2022, LSG vs RR: दीपक हुडाचा अर्धशतकी लढा व्यर्थ; राजस्थानचा लखनौवर 24 धावांनी ‘जायंट’ विजय, प्ले ऑफच्या दिशेने टाकलं दमदार पाऊल
राजस्थान रॉयल्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, LSG vs RR: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात आयपीएलचा (IPL) 63 वा सामना नुकताच मुंबईच्या ब्रेबर्न स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात संजू सॅमसनच्या राजस्थानने 24 धावांनी मोठा विजय मिळवला आणि आयपीएल 15 मधील प्लेऑफच्या दिशेने महत्वाचं पाऊल टाकलं आहे. रॉयल्सने लखनौपुढे 179 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात राजस्थानच्या भेदक गोलंदाजीपुढे लखनौच्या फलंदाजांनी गुडघे टेकले आणि संघ 20 ओव्हरमध्ये बाद 154 धावाच करू शकला. परिणामी राजस्थान रॉयल्सने लखनौचा धावांनी धुव्वा उडवला आणि महत्वपूर्ण आठवा विजय खिशात घातला. दरम्यान राजस्थानच्या या विजयामुळे लखनौचा स्टार फलंदाज दीपक हुडा (Deepak Hooda) याची अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. हुडाने एकहाती लढा दिला आणि संघासाठी सर्वाधिक 59 धावा केल्या. तसेच कृणाल पांड्याने 25 धावांची खेळी केली. याशिवाय अन्य फलंदाज रॉयल्सच्या गोलंदाजांपुढे तग धरून खेळू शकले नाही.

दुसरीकडे, राजस्थानच्या विजयात ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेद मॅकॉय यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर युजवेंद्र चहल आणि आर अश्विन यांना 1-1 यश मिळाले. सॅमसनच्या राजस्थान संघाने दिलेल्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना लखनौच्या आघाडीचे तीन फलंदाज झटपट पॅव्हिलियनमध्ये परतले. क्विंटन डी कोक, आयुष बडोनी आणि कर्णधार केएल राहुल स्वस्तात बाद झाले. यामुळे मधल्या फळीवरील दडपण वाढले. हुडा आणि कृणालच्या अर्धशतकी भागीदारीने संघाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या. मात्र आर अश्विनने कृणालच्या खेळीवर लगाम खेचली आणि लखनौची चौथ्या विकेटसाठीची 65 धावांची भागीदारी मोडली. कृणाल पाठोपाठ अर्धशतक करून हुडाने देखील पॅव्हिलियनची वाट धरली. धडाकेबाज अष्टपैलू जेसन होल्डर देखील संघाचा डाव सावरण्याचा अपयशी ठरला. होल्डर आणि दुश्मंत चमीरा एकापाठोपाठ माघारी परतले. मार्कस स्टोइनिसने काही मोठे फटके खेळून धावांमधील अंतर कमी केले. पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. स्टोइनिस 27 धावा करून शेवटच्या ओव्हरमध्ये माघारी परतला.

अशाप्रकारे या सामन्यातील विजयाने आता राजस्थान संघाने प्ले ऑफच्या आणखी एक पाऊल पुढे टाकले असून त्यांना आता प्ले ऑफसाठी उर्वरित आणखी एक सामना जिंकावा लागणार आहे. दुसरीकडे, लखनौला देखील आता अंतिम 4 मध्ये पोहोचण्यासाठी लीग सामन्यातील शेवटचा समान जिंकणे भाग असेल. राजस्थान आणि लखनौ दोघे 16 पॉईंटसह प्लेऑफ प्रवेश करण्याचे प्रबळ दावेदार आहेत. लखनौचा पुढील सामना कोलकाता तर राजस्थान अखेरच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सशी भिडेल.