IPL 2022, CSK vs RCB: विराट कोहली, MS Dhoni यांना खुणावतायेत मोठे विक्रम, ‘करो या मरो’च्या सामन्यात दोन दिग्गजांवर असेल करडी नजर; वाचा सविस्तर
विराट कोहली-एमएस धोनी (Photo Credit: Twitter)

IPL 2022, CSK vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात आयपीएलचा (IPL) ‘करो या मरो’चा सामना रंगणार आहे. या सामन्यातील पराभव चेन्नईला प्लेऑफच्या शर्यतीतून अधिकृतपणे बाहेर करेल, तर आरसीबीच्या अडचणीत प्लेऑफमध्ये पोहोचणार रस्ता खडतर होईल. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघाना त्यांच्या खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा असतील. आरसीबीचे नेतृत्व फाफ डु प्लेसिस करत आहे तर एमएस धोनीकडे (MS Dhoni) पुन्हा चेन्नईची कमान आली आहे. कर्णधार म्हणून पुनरागमन करणारा धोनीला आगामी सामन्यामध्ये मोठा विक्रम खुणावत आहे. तर बेंगलोरचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) देखील चेन्नईविरुद्ध संघाचा मुख्य खेळाडू ठरू शकतो. यामागचे कारण खालीलप्रमाणे आहे. (IPL 2022 Points Table Updated: गुजरात टायटन्सच्या पराभवानंतर पॉईंट टेबलमध्ये मोठे बदल, जाणून घ्या सध्याची स्थिती)

धोनीने 301 टी-20 सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. धोनीने कर्णधार म्हणून या सामन्यांच्या 185 डावांमध्ये एकूण 5994 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत तो 6000 धावांपासून फक्त 6 धावा दूर आहे आणि धोनीने बेंगलोरविरुद्ध सामन्यात आणखी 6 धावा केल्या तर कर्णधार म्हणून टी-20 क्रिकेटमध्ये 6000 धावा करणारा तो दुसरा खेळाडू ठरेल. त्याच्या आधी विराटने हा पराक्रम केला आहे. विराट कोहलीने कर्णधार म्हणून 190 टी-20 सामन्यांच्या 185 डावांमध्ये त्याने 43.29 च्या सरासरीने 6451 धावा केल्या आहेत. विराट कर्णधार म्हणून टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. विराटने टी-20 सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून फलंदाजी करताना 5 शतके आणि 48 अर्धशतके झळकावली आहेत. तर धोनीने कर्णधार म्हणून 38.67 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

दुसरीकडे, विराट कोहलीची बॅट चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध धावा करण्यात पटाईत आहे आणि याचा पुरावा म्हणजे CSK विरुद्ध 1000 धावा पूर्ण करण्यापासून विराट फक्त 51 धावा दूर आहे. जर त्याने आजच्या सामन्यात अर्धशतकी पल्ला गाठला तर शिखर धवननंतर ही कामगिरी करणारा कोहली हा दुसरा फलंदाज ठरेल. आरसीबीच्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात दमदार अर्धशतकासह कोहली लयीत परतला आहे. विराटच्या फॉर्ममुळे संघाचा आत्मविश्वास वाढला असेल तर तो चेन्नई संघासाठी धोक्याचा ठरू शकतो. अशाप्रकारे आजच्या सामन्यात क्रिकेटच्या या दोन दिग्गज खेळाडूंकडे मोठ्या विक्रमांना गवसणी घालण्याची चांगली संधी आहे.