IPL 2022: रवींद्र जडेजा याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जची (Chennai Super Kings) आयपीएल (IPL) 2022 मध्ये अत्यंत निराशाजनक सुरुवात झाली आहे. खेळाडूंच्या दुखापतींमुळे त्रस्त झालेल्या सीएसकेने (CSK) पहिले दोन सामने गमावून मोसमाची सुरुवात केली. कोलकाताकडून सलामीचा सामना गमावल्यानंतर, लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या उच्च-स्कोअरिंग सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएलच्या इतिहासात सीएसकेने हंगामातील पहिले दोन सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामागे अनेक मोठे कारण आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचा धाकड वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) याची सीएसकेला सर्वाधिक उणीव भासत आहे. चाहर जखमी झाला आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी तो सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे प्रशिक्षण घेत आहे. त्यामुळे त्याच्या कमबॅककडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (IPL 2022, LSG vs CSK Match 7: लखनऊने उघडलं विजयाचं खातं, क्विंटन डी कॉक-एविन लुईस चमकदार कामगिरी; जडेजाच्या सुपर किंग्सला सलग दुसरा पराभवाचा धक्का)
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दीपक चाहर एप्रिलच्या अखेरीस चेन्नई संघात सामील होण्याची शक्यता आहे. म्हणजेच अर्धा सामना चेन्नई संघाला दीपकशिवाय खेळावा लागणार आहे. दीपकला दोन आठवड्यात NCA मधून डिस्चार्ज मिळू शकतो असे सांगण्यात आले आहे. त्यानंतर दीपक थेट मुंबई गाठेल आणि चेन्नई संघात सामील होईल. इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या लिलावात दीपकसाठी चेन्नईनें 14 कोटींची मोठी रक्कम मोजली. आणि आता जर सर्व काही ठीक झाले तर दीपक 25 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्याद्वारे आयपीएल 2022 चा पहिला सामना खेळण्याची शक्यता आहे. दरम्यान, दीपक चाहर व्यतिरिक्त सीएसके एडम मिल्ने आणि ख्रिस जॉर्डन देखील सध्या फिटनेसने त्रस्त आहे. केकेआरविरुद्धच्या पहिल्या सामन्यादरम्यान मिल्ने जखमी झाला होता, तर जॉर्डन टॉन्सिलच्या संसर्गामुळे 6 दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात आहे.
मोसमातील पहिले दोन सामने गमावलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा पुढील सामना पंजाब किंग्ज विरुद्ध 3 एप्रिल रोजी होणार आहे. हा सामना जिंकून रवींद्र जडेजाच्या नजरा संघाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यावर असेल. चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा पहिला सामना 6 विकेटने गमावला. या सामन्यात चेन्नईने केवळ 132 धावांचे लक्ष्य दिले होते. तर दुसऱ्या सामन्यात चेन्नई संघाने 210 धावा करूनही सामना गमावला. या सामन्यात धोनीच्या संघात एका चांगल्या वेगवान गोलंदाजाची सर्वाधिक कमतरता जाणवली.