राशिद खान व मोहम्मद नबी (Photo Credit: Instagram)

IPL 2021: अफगाणिस्तानची (Afghanistan) सद्यस्थिती पाहता, 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात राशिद खान (Rashid Khan) आणि मोहम्मद नबी (Mohammad Nabi) सहभागी होऊ शकतील का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अफगाणिस्तान आता तालिबानच्या (Taliban) ताब्यात आहे, त्यामुळे या संपूर्ण घटनेचा अफगाणिस्तान खेळाडूंवरही परिणाम होऊ शकतो. यादरम्यान, आयपीएल (IPL) फ्रँचायझी संघ सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) राशिद आणि नबी दोघेही आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी उपलब्ध असतील अशी पुष्टी केली आहे. एएनआय शी बोलताना SRH चे मुख्य कार्यकारी अधिकारी के शानमुगम म्हणाले, “सध्याची परिस्थिती कशी आहे याबद्दल आम्ही बोललो नाही, परंतु दोन्ही स्पर्धासाठी उपलब्ध आहेत. आम्ही 31 ऑगस्टला यूएईला (UAE) रवाना होऊ.” (Afghanistan Crisis: आफगाणिस्तान मध्ये तालिबानींचा वाढता कब्जा पाहता Kabul Airport वर नागरिकांच्या तोबा गर्दीचं भयावह दृश्य)

दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने अलीकडेच सांगितले की, राशिद खान अफगाणिस्तानमधील आपल्या कुटुंबाबद्दल खूप चिंतित आहे कारण तो आपल्या कुटुंबाला देशाबाहेर नेण्यास असमर्थ आहे. काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. राशिद आणि नबी दोघेही सध्या ब्रिटनमध्ये (यूके) आहेत आणि द हंड्रेड लीग स्पर्धेत खेळत आहेत. आयपीएल 2021 चा पहिला टप्पा भारतात एप्रिल-मे दरम्यान खेळला गेला होता, पण बायो बबलमध्ये कोविड-19 च्या शिरकावानंतर स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. आयपीएलचे उर्वरित सामने यूएईमध्ये 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान खेळले जाणार आहेत. राशिद खान आणि मोहम्मद नबी हे सनरायझर्स हैदराबादचे महत्त्वाचे खेळाडू आहेत आणि जर या दोन खेळाडूंनी पहिल्या टप्प्यात संघाच्या खराब कामगिरीनंतर दुसऱ्या टप्प्यातून माघार घेतली तर संघासाठी हा मोठा झटका असेल.

गेल्या महिन्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यूएई येथे होणाऱ्या आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. या दरम्यान 27 दिवसात एकूण 31 सामने खेळले जाणार आहेत. आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्राचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल.