IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021च्या दुसऱ्या टप्प्याचे काउंटडाउन सुरु झाले आहे. मे महिन्यात कोविड-19 मुळे स्थगित करण्यात आलेला आयपीएलचा (IPL) 14 वा हंगाम 17 ऑक्टोबरपासून खेळला जाणार आहे. इंडियन प्रीमियर लीग 2021 चा दुसरा टप्पा सुरू होण्यास अजून एक महिना शिल्लक आहे परंतु काही संघ आधीच यूएईमध्ये दाखल झाले आहेत. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांनी त्यांचा सहा दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण केला आहे. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) देखील लवकरच त्यांच्यात सामील होईल आणि शनिवार, 21 ऑगस्ट यूएईसाठी (UAE) रवाना होईल. पण स्पर्धेपूर्वी दिल्ली फ्रँचायझीपुढे कर्णधार निवडीचा मोठा पेच फसला आहे. (DC प्रशिक्षक रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना दिला गुरु मंत्र, टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम)
एएनआय नुसार, फ्रँचायझी अजूनही सर्व महत्वाच्या निर्णयाबद्दल अनिश्चित आहे. “दिल्ली कॅपिटल्स शनिवारी पहाटे आयपीएल 2021 साठी यूएईला रवाना होईल. टीम घरगुती खेळाडू आणि अधिकाऱ्यांसह दिल्लीहून रवाना होईल. घरगुती खेळाडूंना आधीच क्वारंटाईन ठेवण्यात आले आहेत आणि त्यांना एक आठवड्यासाठी यूएईमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांचे शिबिर सुरू होईल,” डीसी अधिकाऱ्याने एएनआयच्या हवाल्याने सांगितले. ते पुढे म्हणाले, “कर्णधाराचा मुद्दा अद्याप अनिर्णित आहे, एकतर तो पंत असेल किंवा अय्यर, संघ व्यवस्थापनाने अद्याप यावर निर्णय घेतला नाही.” श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) आयपीएल 2018 दरम्यान डीसीचे (DC) कर्णधारपदाची धुरा सांभाळली आणि 2012 नंतर पहिल्यांदाच प्लेऑफसाठी पात्र ठरत फ्रँचायझीच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. दिल्लीने गेल्या हंगामात सर्वोत्तम कामगिरी केली आणि आयपीएल 2020 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
अय्यर आयपीएल 2021 मध्ये संघाचे नेतृत्व करण्यास तयार दिसत होता परंतु खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला संपूर्ण मोसमातून बाहेर बसावे लागले आणि रिषभ पंतला (Rishabh Pant) त्याच्या अनुपस्थितीत संघाची जबाबदारी देण्यात आली. पंतच्या नेतृत्वात देखील दिल्लीची प्रभावी खेळी सुरूच राहिली आणि 14 वा मोसम स्थगित होईपर्यंत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. दरम्यान, पुढील काही आठवड्यांत कर्णधारपदाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. पंत इंग्लंडविरुद्ध कसोटी संघाचा भाग आहे आणि सप्टेंबरमध्ये इतर राष्ट्रीय खेळाडूंसह यूएईमध्ये दाखल होईल.