मुंबई इंडियन्स (Photo Credit: Twitter/IPL)

MI vs RCB IPL 2021 Stats: इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) 14 वे सत्र शुक्रवार, 9 एप्रिल 2021 पासून सुरु होणार आहे. यंदाच्या हंगामाचा पहिला सामना गतविजेते मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघात एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई (Chennai) येथे खेळला जाईल. मागील मोसमात मुंबई 14 लीग सामन्यापैकी 9 सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत आघाडीवर होते आणि यंदा देखील ते शानदार प्रदर्शन सुरु ठेवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. मुंबई इंडियन्स भारतातील प्रसिद्ध लीगमधील सर्वात यशस्वी टीम आहे. संघाने मागील 13 हंगामात एकूण पाच विजेतेपद जिंकले आहेत. विशेष म्हणजे ही कमाल त्यांनी ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात केली आहे. मात्र, एक गोष्ट आहे जी मुंबई इंडियन्सच्या अनुकूल नाही आणि ती म्हणजे स्पर्धेच्या त्यांना पहिल्या सामन्यातील आकडेवारी. 2010 पासून संघाने नऊ वेळा प्लेऑफ फेरी गाठली आहे, तथापि चकित करणारी गोष्ट म्हणजे संघ 2013 पासून आयपीएलचा आपला पहिला सामना जिंकण्यात अपयशी ठरला आहे. (Mumbai Indians IPL 2021 Strength and Weakness: मुंबई इंडियन्सला रहावे लागणार सावध, या कमजोरीमुळे भंग होऊ शकते आयपीएल हॅटट्रिकचे स्वप्न)

2013 पासून मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या प्रत्येक मोसमातील सर्व पहिले खेळ गमावले आहेत. सुरुवातीच्या खेळांमधील त्यांना सलग 8 पराभवाला सामोरे जावे लागले आहे मात्र बर्‍याच प्रकरणांमध्ये त्यांनी जोरदार पुनरागमन केले जे खूपच आकर्षक ठरले आहे. 2008 आणि 2009 च्या सुरुवातीच्या हंगामात मुंबईला संघर्ष करावा लागला मात्र, नंतर फ्रँचायझी एक मजबूत संघ म्हणून उदयास आली आहे. संघात अनियमित बदल आणि खेळाडूंच्या फॉर्ममधील सातत्य यामागील मुख्य कारण असल्याचे म्हटले जाते. गेल्या अनेक वर्षात मुंबई फ्रँचायझीने आपल्या मुख्य खेळाडूंना संघात कायम ठेवले असून संघात अधिक बदल केलेले नाही. त्यामुळे, आरसीबी संघाविरुद्ध आजच्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स पहिल्या सामन्यातील आपल्या पराभवाची मालिका मोडते की नाही याकडे नक्कीच सर्व चाहत्यांचे लक्ष लागून असेल.

दुसरीकडे, आरसीबीने तीन वेळा आयपीएलचा सलामीचा सामना खेळला असून यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. शिवाय, विराट कोहलीच्या आरसीबीने आयपीएल 2020 मध्ये अखेरचे 5 सामने देखील गमावले आहेत. यापूर्वी त्यांनी 2018 आणि 2019 दरम्यान सलग एकूण 7 सामन्यात पराभवाची नोंद केली आहे. अशास्थितीत आजच्या सामन्यात कोणता संघ आपल्या जुन्या आकडेवारीला मागे टाकून विजयाची नोंद करेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.