क्रिस मॉरिस (Photo Credit: PTI)

IPL 2021 Auction: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज क्रिस मॉरिस (Chris Morris) आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. मॉरिसचा संघात समावेश करण्यासाठी राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आयपीएलच्या इतिहासातील आजवरचे सर्वाधिक 16.25 कोटी रुपये मोजले. आयपीएल 2020 मोसमानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मॉरिसला रिलीज केले होते. यासह मॉरिसने माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंहचा (Yuvraj Singh) आजवरचा अबाधित रेकॉर्ड मोडला. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बोली आकर्षित करण्याचा मान युवराजना मिळवला होता, मात्र आता तो मॉरिसच्या नावावर झाला आहे. युवराजवर 2015 हंगामात दिल्ली डेअरडेव्हिल्स (Delhi Daredevils) आता दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने त्याला सर्वाधिक 16 कोटींची बोली लावली होती. त्यानंतर, फक्त युवीचा हा रेकॉर्ड मोडण्यासाठी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) त्याच्या जवळ पोहचला मात्र अपयशी ठरला. कमिन्ससाठी 2020 लिलावात कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझीने 15.50 कोटी रुपयांची बोली लावली होती.  (IPL 2021 लिलावाच्या काही तासांपूर्वी 2 कोटी बेस प्राइस असलेल्या 'या' गोलंदाजाने घेतली माघार, जाणून घ्या कारण)

चेन्नईमध्ये सुरु असलेल्या लिलावाबद्दल बोलायचे तर आतापर्यंत मॉरिसनांतर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याच्यावर यंदाची दुसरी सर्वाधिक बोली लावण्यात आली आहे. मॅक्सवेल याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात चढाओढी पाहायला मिळाली, पण अखेरीस कर्णधार विराट कोहलीच्या आरबीने (RCB) बाजी मारली आणि ऑस्ट्रेलियन अष्टपैलूला 14.25 कोटी रुपयात आपल्या ताफ्यात सामील केले. मॅक्सवेलसाठी 2020 आयपीएल हंगाम निराशाजनक राहिला, मात्र असे असूनही मोठ्या फ्रँचायझींनी ऑस्ट्रेलियन अष्टपैलूला विकत घेण्यात रस दाखवला. मॅक्सवेल टी-20 स्वरूपातील सर्वात नामांकित खेळाडूंपैकी एक आहे आणि विरोधी संघाकडून सामना खेचून आणण्याची त्याची क्षमता त्याला एक मोठी संपत्ती बनवते. तथापि, ऑस्ट्रेलियन खेळाडूचे सातत्य एक मोठी चिंतेची बाब आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्स, आरसीबी आणि पंजाब किंग्ज संघाने सुरु असलेल्या लिलावात मॉरिसला खरेदी करण्यासाठी आवड दर्शवली होती. मॉरिसच्या आयपीएल करिअरबद्दल बोलायचे तर त्याने 70 सामन्यात7.81 च्या इकॉनॉमी रेटने 80 विकेट घेतल्या आहेत, तर 157 आणि अधिकच्या स्ट्राईक रेटने 551 धावा केल्या आहेत.