IPL 2021 लिलावाच्या काही तासांपूर्वी 2 कोटी बेस प्राइस असलेल्या 'या' गोलंदाजाने घेतली माघार, जाणून घ्या कारण
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: IANS)

IPL 2021 Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आगामी 14व्या हंगामासाठी आज 291 खेळाडूंना बोली लावावी जाणार आहे. आयपीएलच्या (IPL) या मिनी लिलावासाठी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडनेही (Mark Wood) आपले नाव नोंदविले आणि त्याची बेस प्राईस 2 कोटी रुपये ठेवली. मात्र, लिलावाच्या काही तासांपूर्वी वुडने आपले नाव मागे घेतले आहे. चेन्नई येथे आठ फ्रँचायजी संघ आज लिलावात खेळाडूंवर बोली लगावतील. इंग्लंड क्रिकेट टीमची रोटेशन पॉलिसी (England Team Rotation Policy) गेल्या काही काळापासून चर्चेत राहिली आहे आणि वुडचा निर्णयही यात सामील झाला आहे. स्पोर्ट्स स्टारच्या वृत्तानुसार, वूड आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवू शकत नाही आणि म्हणूनच त्याने आयपीएल 2021 च्या लिलावातून (IPL Auction) माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. वूड सध्या भारतात आहे आणि 24 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या भारताविरुद्ध उर्वरित कसोटी सामन्यासाठी त्याचा इंग्लंड संघात समावेश करण्यात आला आहे. वुडला आपल्या कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ घालवायचा होता म्हणून त्याने लिलावातून माघार घेत आंतरराष्ट्रीय पातळीशिवाय टी-20 लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. (IND vs ENG 3rd Test D/N 2021: तिसर्‍या टेस्ट सामन्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा; दोन स्फोटक गोलंदाज करणार कमबॅक तर ‘या’ खेळाडूची होणार मायदेशी रवानगी)

वुड यांनी आतापर्यंत 18 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 11 टी-20 सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे आणि भारताविरुद्ध दुसर्‍या कसोटीनंतर केवळ संघात प्रवेश केला आहे. वूडच्या इंडियन प्रीमियर लीग खेळाबद्दल बोलायचे तर त्याने टी-20 लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून फक्त एक सामना खेळला आहे. आयपीएल 14 च्या लिलावामधून कर्णधार जो रूट, अ‍ॅलेक्स हेल्स, मोईन अली आणि जेसन रॉय यांच्यासह तब्बल 16 इंग्लंड खेळाडूंनी बाहेर राहण्याचा  आहे. शिवाय, लिलावापूर्वी बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, सॅम कुर्रान, जॉनी बेयरस्टो अशा 8 इंग्लिश खेळाडूंना आयपीएल फ्रँचायझींनी रिटेन केले आहेत. दुसरीकडे, वूडने अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने आता एकूण 291 क्रिकेटपटूंवर बोली लगावली जाईल. यामध्ये 164 भारतीय, 124 विदेशी आणि तीन खेळाडू असोसिएट राष्ट्रांचे आहेत.

दरम्यान, भारताविरुद्ध अहमदाबाद येथील उर्वरित दोन कसोटी सामन्यांबद्दल बोलायचे तर वूड आणि विकेटकीपर जॉनी बेअरस्टो बुधवारी इंग्लंडच्या संघात चेन्नईत दाखल झाले. तिसरी कसोटी 24 फेब्रुवारीपासून सुरू होईल. विशेष म्हणजे हा सामना पिंक-बॉलने दिवस/रात्र खेळला जाणार आहे. मंगळवारी, एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात 317 धावांनी विजयानंतर इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका भारताने मंगळवारी 1-1 अशी बरोबरी साधली.