IPL 2020 Update: सुरेश रैनाने अखेर आयपीएल 13 मधून बाहेर पडण्याचे कारण स्पष्ट केले, 'CSK माझे कुटुंब आहे' म्हणत कमबॅकवर दिला इशारा
सुरेश रैना (Photo Credits: Instagram)

चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) स्टार फलंदाज सुरेश रैनाने (Suresh Raina) अखेर युएईतील (UAE) टीम कॅम्पमधून बाहेर पाडण्याबाबत मौन सोडले. रैनाने अचानक स्पर्धेतून माघार घेतली आणि तो भारतात परतला. टीम इंडियाच्या माजी फलंदाजाच्या या एकाएकी निर्णयाने फ्रँचायझीसह चाहत्यांनाही धक्का बसला. सुरूवातीला त्याच्या या माघारीमागे वैयक्तिक कारण आहे असं सांगितलं जात होतं. पठाणकोटमध्ये त्याच्या कुटुंबीयांवर झालेला हल्ला आणि करोनाची भीती अशा दोन कारणांचा त्याच्या माघारीशी संबंध जोडला गेला होता. आणि रैनाने स्वतः आपल्या निर्णयामागील कारण स्पष्ट केले. रैनाने स्पर्धेतून माघार घेण्याच्या मागे त्याच्यात आणि माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्यात हॉटेल रूमवरून झालेला वाद कारणीभूत असल्याचे वृत्त Outlook ने दिले. पण रैनाने आपला निर्णय स्पष्ट केल्यामुळे सर्व अफवा फेटाळून लावल्या. धोनी आणि सुपर किंग्ज संघ-व्यवस्थापन यांच्यात सर्व काही ठीक आहे हे स्पष्ट करत त्याने वैयक्तिक कारणास्तव आणि आपल्या कुटूंबासमवेत राहण्यासाठी भारतात परतल्याचे सांगितले. (सुरेश रैनाने नातेवाईकांवर दरोडेखोरांच्या हल्ल्याबाबत सोडले मौन, पंजाब पोलिसांना प्रकरणात लक्ष घालण्याची केली विनंती)

पुढील चार -5 वर्षे संघात खेळण्याची अपेक्षा करत असल्याचेही तो म्हणाला. Cricbuzzला दिलेल्या मुलाखतीत रैना म्हणाला, “हा वैयक्तिक निर्णय होता आणि मला माझ्या कुटुंबासाठी परत यावे लागले. होम फ्रंटवर असे काहीतरी होते ज्यावर तत्काळ लक्ष देण्याची गरज होती. सीएसके माझं कुटुंबही आहे आणि माही भाई माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि हा एक कठोर निर्णय होता. सीएसके आणि माझ्यात कोणताही वाद नाही.” रैना पुढे म्हणाला की, “माझं एक तरुण कुटुंब घरी आहे आणि मला काळजी वाटते की मला काही झालं तर, त्यांचं काय होणार? माझे कुटुंब माझ्यासाठी सर्वात महत्वाचे आहे आणि या काळात मी खरोखर त्यांच्याबद्दल काळजी करतो.” दरम्यान, रैना क्वारंटाइन काळात फक्त वेळ घालवत नाही तर आयपीएलमधील नंतरच्या काळात ज्या संधी मिळू शकतात त्यासाठी प्रशिक्षणात व्यस्त आहे. “येथे क्वारंटाइन असतानाही मी प्रशिक्षण घेत आहे. तुला तिथे कधीच शिबिरात दिसू शकत नाही हे माहित नाही,” रैनाने ठामपणे सांगितले.

रैना असेही म्हणाला की आपल्या कुटुंबाविषयीच्या भीतीशिवाय, त्याच्या नातेवाईकांवर दरोडेखोरांचा हल्ला आणि काकांच्या हत्येने देखील त्याच्या अचानक परत येण्याच्या निर्णयामध्ये भूमिका बजावली. “पठाणकोट घटना अतिशय भयानक होती आणि आमच्या कुटुंबातील प्रत्येकासाठी खरोखर त्रासदायक होती. परत येऊन त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी माझी होती. पण मी परत आल्यापासून, मी येथे क्वारंटाइन आहे. म्हणून, मला अजूनही माझ्या पालकांना आणि आत्याला भेटायला जावे लागेल जे सर्व मोठ्या दुःखात आहेत.” रैनाने सांगितले. पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात राहत्या घरी डोरल्याच्या भीषण घटनेत रैनाचे काका अशोक कुमार याचा मृत्यू झाला. तर त्याच्या काकू आणि दोन चुलतभावांना गंभीर दुखापत झाली. रैनाच्या दोन चुलत भावांपैकी एकाचा मृत्यू झाल्याचं माजी फलंदाजाने मंगळवारी ट्विटरद्वारे माहिती दिली.