सुरेश रैना आणि रुतुराज गायकवाड (Photo Credit: Instagram)

तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर परतणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगचे (Indian Premier League) सध्या चाहत्यांना वेध लागले आहे. प्रसिद्ध टी-20 लीगच्या पार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) फलंदाज सुरेश रैनाने (Suresh Raina) एकाएकी स्पर्धेतून माघार घेतली आणि तो भारतात परतला. सुरूवातीला त्याच्या या माघारीमागे वैयक्तिक कारण आहे असं सांगितलं जात होतं. रैनाने स्पर्धेतून माघार घेण्याच्या मागे त्याच्यात आणि माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांच्यात रूमवरून झालेला वाद कारणीभूत असल्याचे वृत्त समोर येत आहे. आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी तो उपलब्ध होणार नाहीत. सीएसके (CSK) कडून रैना आणि त्याच्या कुटुंबाला पूर्ण सहकार्य मिळेल असे सीएसकेचे मालक एन श्रीनिवासन यांनी म्हटले. पण, रैना भारतात परतल्यावर त्याच्या जागी तिसऱ्या स्थानावर आता कोणता फलंदाज खेळेल यावर सध्या चर्चा रंगली आहे. (IPL 2020 Update: 'माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जातो हे दुर्दैवी, टीम सुरेश रैनाच्या कायम पाठीशी',CSK बॉस एन श्रीनिवासन यांचा घूमजाव)

संपूर्ण आयपीएल स्पर्धेत रैना उपलब्ध नसल्याने त्याच्या जागी सीएसकेने अद्याप कोणताही नाही फलंदाज मागितला नसल्याने ते टीममध्ये उपलब्ध मुरली विजय, सॅम कुर्रान आणि युवा रुतुराज गायकवाड यांना संधी देऊ शकतात.

रुतुराज गायकवाड

सीएसकेचे मालक श्रीनिवासन आऊटलूकशी बोलताना म्हणाले, “रुतुराज गायकवाड एक अप्रतिम फलंदाज आहे. (रैनाने माघार घेतल्याने) त्याला आता नक्कीच संघात संधी मिळेल. अवघा 23 वर्षीय गायकवाड 2019 पासून सीएसकेचा भाग आहे परंतु अद्याप तो खेळ खेळू शकलेला नाही. रैनाच्या अनुपस्थितीत महत्त्वपूर्ण टॉप-ऑर्डरच्या भूमिकेसाठी संघासाठी तो एक पर्याय असू शकतो.” 2018-19 च्या हंगामात, विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याने महाराष्ट्राकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने आठ डावात 90 च्या स्ट्राईक रेट आणि 45.62 च्या सरासरीने 365 धावा केल्या. शिवाय, या वर्षाच्या सुरुवातीला त्याने सय्यद मुश्ताक अली करंडक दुसऱ्या सर्वाधिक धावा केल्या. त्याने जवळजवळ 42 च्या सरासरीने 419 धावा केल्या आणि या दरम्यान त्यांचा स्ट्राईक रेट 146 हुन अधिक होता.

सॅम कुर्रान

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सीएसकेसाठी सुनील नरेनसारखी भूमिका बजावू शकतो. एक युवा अष्टपैलू खेळाडू, कुर्रान हा चांगला स्ट्रायकर आहे आणि प्रयोग करण्याचा निर्णय घेतल्यास तो सीएसकेसाठी नरेनप्रमाणे कामगिरी करू शकतो. या निर्णयामुळे सीएसकेला आणखी एक प्रश्न सोडविण्यास मदत होऊ शकेल, वरच्या फळीत रैना हा एकमेव डावखुरा एकमेव पर्याय होता.

मुरली विजय

सीएसके अनुभवांनी भरलेला संघ आहे आणि आयपीएलच्या इतिहासात यशस्वी सलामीवीरांपैकी एक म्हणजे मुरली विजय. सुरुवातीच्या काही वर्षांत विजयने सीएसकेच्या ट्रॉफी विजयात मोठी भूमिका निभावली होती आणि विशेषत: मोठ्या सामन्यात खेळण्याच्या कौशल्यासाठी तो ओळखला जातो. आणि संधी मिळाल्यास तो उत्तम खेळ करेल यात शंका नाही. मागील हंगामात, जेव्हा सीएसके इलेव्हनमध्ये त्याच्यासाठी संधी मर्यादित होत्या, तेव्हा चेपॉक येथे कठीण फलंदाजी परिस्थितीत विजयने दोन सामन्यांत 64 धावा केल्या आणि सलामी फलंदाज असल्याने नंबर 3 वर फलंदाजी करणे त्याच्यासाठी कठीण ठरणार नाही. किंवा शेन वॉटसनसोबत विजय डावाची सुरुवात करून रायुडू तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी येऊ शकतो.

दुबईला रवाना होण्यापूर्वी सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केएस विश्वनाथन म्हणाले की विजय आणि रुतूराज दोघेही चेन्नईच्या कॅम्पमध्ये प्रभावी फलंदाजी करीत होते. आणि आगामी आयपीएलमध्ये सीएसकेसाठी दोघांपैकी एकाची महत्त्वपूर्ण भूमिका असू शकते.