IPL 2020 Update: डेविड वॉर्नर, बेन स्टोक्ससह इतर इंग्लंड-ऑस्ट्रेलियाई क्रिकेटर्स आयपीएल 13 च्या पहिल्या काही सामन्यातून असणार गायब? जाणून घ्या यामागील कारण
जॉनी बेअरस्टो आणि डेविड वॉर्नर (Photo Credits: IANS)

इंडियन प्रीमिअर लीग 2020 (Indian Premier League) यंदा युएई (UAE) येथे आयोजित करण्याचे निश्चित झाले आहे. आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी तारखांची पुष्टी करत 19 सप्टेंबर रोजी पहिला सामना खेळला जाईल, तर फायनल 8 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल याबाबत माहिती दिली. भारतीय क्रिकेटपटूंसह परदेशी खेळाडूही 20 ऑगस्ट पर्यंत युएईत दाखल होतील अशी माहिती समोर येत आहे. तर काही फ्रँचायझींनी आयोजन होणाऱ्या युएईत लवकर पोहचून सरावाला सुरुवात करतील, ज्यात चेन्नई सुपर किंग्सचा समावेश आहे. मात्र, इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलियाचे (Australia) खेळाडू जसे डेविड वॉर्नर, जोफ्रा आर्चर, स्टिव्ह स्मिथ, पॅट कमिन्स आयपीएलच्या सुरुवाती सामन्यातून गायब असतील. यामागील कारण म्हणजे इंग्लंड-ऑस्ट्रेलियामधील द्विपक्षीय मालिका (England-Australia Series) . दोन्ही टीममध्ये टी-20 आणि वनडे मालिका खेळली जाईल जी 16 सप्टेंबर रोजी संपेल. ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा यंदा जुलै महिन्यात होणार होता, पण अन्य संघांच्या दौऱ्यांप्रमाणे यावरही कोरोना व्हायरसचा फटका बसला. अहवालानुसार इंग्लंड-ऑस्ट्रेलियामध्ये 4 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान मालिका खेळली जाईल. (IPL 2020 Update: BCCI ने अमीरात क्रिकेट बोर्डाला पाठवले स्वीकृती पत्र, आता भारत सरकारच्या निर्णयाकडे लक्ष)

अशा परिस्थितीत 16 सप्टेंबर रोजी अखेरचा सामना झाल्यास दुसऱ्या दिवशी युएईसाठी रवाना होतील. युएईत दाखल झाल्यावर खेळाडूंना त्यांची कोरोना चाचणी घेतली जाईल जी नकारात्मक आल्यावर त्यांना अन्य खेळाडूंसोबत जुडण्याची परवानगी मिळेल. शिवाय, त्यांना 7 ते 10 दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीतूनही जावे लागेल. परिणामी, या खेळाडूंना आयपीएलमधील काही सामन्यांना मुकावे लागेल. या खेळाडूंमध्ये डेविड वॉर्नर, बेन स्टोक्स, स्टिव्ह स्मिथ, जोस बटलर, जोफ्रा आर्चर अशा हार्ड-हिटर खेळाडूंचा समावेश आहे.

दुसरीकडे, इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या दौर्‍यासह ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये पुन्हा कामगिरी करण्याच्या तयारीत आहे.ऑस्ट्रेलियन सरकारकडून त्यांना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. या दौऱ्यासाठी त्यांनी यापूर्वी 26 सदस्यीय संघ आधीच जाहीर केला आहे. 13 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध वनडे सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड वनडे मालिका कारण कोरोना व्हायरस उद्रेकानंतर थांबविण्यात आली होती. इंग्लंड आणि वेस्ट इंडीजमध्ये सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी सामन्यांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू झाले.