IPL 2020 Update: सुरेश रैना, लसिथ मलिंगा, हरभजन सिंहसह 6 तगड्या खेळाडूंची पीछेहाट, पाहा 13 व्या मोसमात भाग न घेणाऱ्या खेळाडूंची लिस्ट व त्यांची रिप्लेसमेंट
सुरेश रैना, लसिथ मलिंगा, हरभजन सिंह (Photo Credits: IANS)

इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 सुरुवात होण्याच्या काही दिवस आधी मुठभर खेळाडूंनी माघार घेतली. कोरोना व्हायरसचा (Coronavirus) उद्रेक वाढणे, नवीन प्रायोजक शोधणे यासारख्या अनेक समस्यांमुळे या स्पर्धेच्या सुरूवातीस शंका निर्माण झाल्या परंतु आयपीएलची (IPL) 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे आणि त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत. आखाती देशात दुसऱ्यांदा आयपीएलचे आयोजन केले जाईल. सुरुवातीला आयपीएल 2020 मार्च 29 पासून भारतात सुरु होणार होते, पण कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर लीगला यूएईमध्ये हलविण्यात आले आणि आता ते सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असताना अनेक मोठ्या खेळाडूंनी विविध कारणांमुळे लीगमधून माघार घेतल्यामुळे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संघांना मोठा फटका बसला. हे सर्व सुरेश रैना (Suresh Raina) पासून सुरू झाले, जो वैयक्तिक कारणे दाखवत बाहेर पडला. (IPL 2020 Update: 'एमएस धोनी काळजी घेईल'; 'थलाइवा'च्या नेतृत्त्व क्षमतेवर CSK CEO कासी विश्वनाथन यांनी व्यक्त केला विश्वास Watch Video)

वेगवेगळ्या फ्रेंचायझीतील पाच अन्य क्रिकेटपटू देखील मागे हटले. यावेळी आपण यंदाच्या मोसमात आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतलेल्या सर्व खेळाडूंवर आणि त्यांच्या रिप्लेसमेंटचा आढावा घेणार आहोत.

सुरेश रैना

यंदाच्या स्पर्धेतून बाहेर पडणारा रैना कदाचित पहिला क्रिकेटपटू होता, जो सीएसकेसाठी मोठा धक्का ठरला. 13 व्या हंगामातून बाहेर पडण्यामागे रैनाने कौटुंबिक कारण दिले. रैना 5,368 धावांसह दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. सीएसकेने अद्याप रैनाच्या जागी दुसऱ्या खेळाडूचे नाव जाहीर केले नाही.

लसिथ मलिंगा

श्रीलंकेचा टी-20 कर्णधार आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा लसिथ मलिंगा वडिलांच्या आजारामुळे आयपीएल 13 मधून बाहेर पडला. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पॅटीन्सनचा संघात बदली खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. मलिंगाला हवी ती मदत करण्याचे आश्वासनही मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी दिले आणि जेम्स पॅटीन्सन याचे संघात स्वागत केले. जेम्स सध्याच्या परिस्थितीत मुंबईसाठी उपयुक्त वेगवान गोलंदाज ठरू शकतो, असा विश्वास अंबानी यांनी व्यक्त केला.

हरभजन सिंह

चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंहने यंदा वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भज्जीने शुक्रवारी याची माहिती दिली. तीन वेळाच्या चॅम्पियन्सने अद्याप त्याच्या बदलीची घोषणा केलेली नाही.

जेसन रॉय

पाकिस्तानविरुद्ध टी-20 मालिकेपूर्वी इंग्लंडचा मर्यादित षटकांचा सलामीवीर जेसन रॉयला साइड स्ट्रेनचा सहन करावा लागला आणि त्याने आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. दुखापतीतून सावरण्यासाठी जेसनकडे पुरेसा वेळ असतानाही त्यापासून बरे होण्यासाठी त्याने अजून काहीसा वेळ घेतला आहे. तथापि, शिखर धवन आणि पृथ्वी शॉमध्ये रेडीमेड ओपनिंग कॉम्बिनेशन असल्याने त्याचा दिल्लीच्या कॅपिटल्सवर परिणाम झाला नाही.

क्रिस वोक्स

इंग्लंडचा अष्टपैलू क्रिस वोक्स यंदाच्या आवृत्तीतून बाहेर पडणारा दिल्ली कॅपिटल्समधील दुसरा क्रिकेटर ठरला. आयपीएलच्या टाइमलाइन दरम्यान पहिले बाळ होणार असल्याने वोक्सने माघार घेतली. वोक्सने मागे हटल्याने दक्षिण आफ्रिकेच्या एनरिच नॉर्टजेसाठी दिल्ली कॅपिटल्सचे दार उघडले.

केन रिचर्डसन

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनने आपल्या मुलाच्या जन्मामुळे आयपीएल आवृत्तीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. रिचर्डसन यापूर्वी बंगळुरू आणि राजस्थानकडून खेळला होता आणि पुन्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची जर्सी दिसणार होता. देशवासीय आणि लेगस्पिनर अ‍ॅडम झांपाने रिचर्डसनची जागा घेतली.

काही दिवसांपूर्वी सीएसके कॅम्पला कोरोना महामारीचा फटका बसला आणि दोन खेळाडूंसोबत 13 जणं कोविड पॉसिटीव्ह आढळले. म्हणूनच, यामुळे जैव-सुरक्षित बबलबद्दल काही क्रिकेटपटूंनी असुरक्षितता दिसली. म्हणूनच त्यांनी स्पर्धेतून बाहेर राहून आपल्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला.