Most Sixes in IPL: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर युएईमध्ये आयोजित करण्यात आलेले इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 आता मध्यावर येऊन पोहचले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात आज, 21 ऑक्टोबर रोजी आयपीएलचा (IPL) 39वा सामना खेळला जाईल. दोन्ही संघांनी आपले मागील सामने जिंकले असल्याने आजच्या सामन्यात विजयी घोडदौड कायम ठेवून प्ले-ऑफ फेरीच्या दिशेने आपली वाटचाल कायम ठेवू पाहत असतील. आरसीबी (RCB) कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) सूर गावाला असल्याने त्याने संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे आणि आता केकेआरविरुद्ध (KKR) पुन्हा एकदा त्याच्याकडून मोठ्या डावाची अपेक्षा असेल. अबू धाबीच्या (Abu Dhabi) शेख झायेद स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल तेव्हा कर्णधार विराटकडे आयपीएलमध्ये दुहेरी शतक झळकवण्याची एक संधी असेल. सामन्यात मोठा डाव खेळत राहिल्यास कोहली एलिटच्या यादीत सामील होऊ शकतो. (KXIP vs DC, IPL 2020: शिखर धवनने सलग दुसरी सेन्चुरी करत केला दमदार विक्रम, 'हा' पराक्रम करणारा बनला पहिलाच फलंदाज)
आयपीएलमध्ये कोहलीने आतापर्यंत 199 षटकार ठोकले आहेत. अशा स्थतीत कोहली पुन्हा एकदा सीमारेषेपार फटका मारण्यास यशस्वी झाल्यास तो रोहित शर्मा आणि महेंद्र सिंह धोनी यांच्यानंतर आयपीएलमध्ये 200 षटकार ठोकणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरेल. एकंदरीत क्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, धोनी आणि रोहितनंतर महत्त्वाचा टप्पा गाठणारा विराट पाचवा फलंदाज ठरू शकतो. गेलने आजवर आयपीएलमध्ये 128 सामन्याच्या 127 डावात सर्वाधिक 335 षटकार ठोकले आहेत. स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 'युनिव्हर्स बॉस' पहिल्या, तर विराटचा आरसीबी साथीदार डिव्हिलिअर्स दुसऱ्या, धोनी तिसऱ्या आणि रोहित चौथ्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यादरम्यान विराट टी-20 क्रिकेट 9 हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. एकूणच गेल, किरोन पोलार्ड, शोएब मलिक, ब्रेंडन मॅक्युलम, डेविड वॉर्नर आणि आरसीबीचा साथीदार आरोन फिंच यांच्यानंतर टी-20 क्रिकेटमध्ये हा टप्पा गाठणारा तो सातवा फलंदाज आहे. विराटची आरसीबी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे, मात्र आयपीएल 13च्या प्ले-ऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना सतत प्रभावी खेळ करणे आवश्यक आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत दुसरे स्थान कायम ठेवले आहेत, तर दिल्ली कॅपिटल्स पहिल्या स्थानावर आहे.