IPL 2020 Auction: 971 खेळाडूंचा होणार लिलाव; मिशेल स्टार्क आणि जो रूट यांनी घेतली माघार, अनेक खेळाडूंची बेस प्राईज जाहीर, घ्या जाणून
रोहित शर्मा आणि एमएस धोनी (Photo Credit: PTI)

या महिन्यात इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 च्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलावाची तारीख जस-जशी जवळ येत आहे तस-तास सर्वांचा उत्साहही वाढत चालला आहे. जगभरातील अनेक इच्छुक खेळाडूंनी लिलावात सामील होण्यासाठी अर्ज केला आहे. पुढच्या वर्षी खेळल्या जाणार्‍या आयपीएलचा लिलाव 19 डिसेंबर रोजी कोलकातामध्ये होणार आहे. जगभरातील खेळाडूंनी यंदाच्या टूर्नामेंटमध्ये भाग घेण्याच्या इच्छेने लिलावासाठी अर्ज भरला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेपूर्वी 971 खेळाडूंचा लिलाव होणार असल्याचे समजले जात आहे. आयपीएल (IPL) 2020 च्या लिलावापूर्वी, सर्व फ्रँचायझींनी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी 15 नोव्हेंबरला जाहीर केली होती. यंदाच्या लिलावात 713 भारतीय आणि 258 विदेशी खेळाडूंनी नोंद केली आहे. आयपीएल संघातील उर्वरित 73 जागा भरण्यासाठी लिलावासाठी 215 कॅप्ड खेळाडू, 754 अनकेप्ड आणि सहयोगी देशांच्या 2 खेळाडूंनी आवेदन भरले आहेत. दरम्यान, सर्वात जास्त किंमत असलेल्या खेळाडूंची यादी देखील जाहीर करण्यात अली आहे. (IPL 2020: लिलावापूर्वी सर्व संघांची संपूर्ण यादी; कोणत्या खेळाडूंना केले Release, कोणत्या संघात कोणत्या खेळाडूंचा झाला समावेश, जाणून घ्या)

यात दोन प्रकार आहेत. पहिली म्हणजे दोन कोटींची सर्वाधिक रक्कम आणि दुसरी दीड कोटी रुपये. स्पोर्टस्टारच्या रिपोर्टनुसार, 2019 चा सर्वात यशस्वी गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) ची बेस किंमत 2 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने जाहीर केलेल्या ऑस्ट्रेलियाचा फलंदाज क्रिस लिन (Chris Lynn) याचीही बेस प्राइसही 2 कोटी रुपयांच्या सर्वोच्च ब्रॅकेटमध्ये ठेवली आहे. ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell), जोश हेजलवुड (Josh Hazlewood) आणि मिशेल मार्श (Mitchell Marsh) ऑस्ट्रेलियाच्या या अन्य खेळाडूंची बेस किंमतही 2 कोटींच्या ब्रॅकेटमध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn) आणि श्रीलंकेचा अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज याचीही किंमत 2 कोटी रुपये आहे. दोन कोटींच्या बेस किंमतीत एकूण 7 खेळाडू आहेत. दुसरीकडे, दीड कोटींच्या ब्रॅकेटमध्ये एकूण 9 खेळाडू आहे.

भारताच्या रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याची बेस प्राईज दीड कोटी आहे. उथप्पा हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे ज्याची बेस प्राईज कोटींमध्ये आहे. इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) यानेदेखील त्याची बेस प्राईज दीड कोटी ठेवली आहे. यामध्ये, इंग्लंडचा जेसन रॉयल, क्रिस वोक्स यांसारख्या इंग्लंडच्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघासह काही सीजन खेळल्यानंतर फ्रेंचाइजीने फिरकीपटू पीयूष चावला याच्यासमवेत उथप्पाला गेल्या महिन्यात रिलीज केले होते. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क आणि इंग्लंडच्या जो रूट यांनी लिलावासाठी नोंद नाही केली आहे. “आम्हाला त्यांचा अर्ज मिळालेला नाही,” असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पोर्टस्टारला स्पष्ट केले.

येथे खेळाडूंचे बेस प्राईज:

2 कोटी: पॅट कमिन्स, जोश हेजलवुड, क्रिस लिन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, डेल स्टेन आणि अँजेलो मॅथ्यूज.

दीड कोटी: रॉबिन उथप्पा, शॉन मार्श, केन रिचर्डसन, इयन मॉर्गन, जेसन रॉय, क्रिस वोक्स, डेविड विली, क्रिस मॉरिस आणि काइल अ‍ॅबॉट.