भारतीय संघाचा (Indian Team) मुख्य प्रशिक्षक बनण्याची शर्यत रंगतदार बनत चालली आहे. आता भारतीय संघाचे माजी व्यवस्थापक लालचंद राजपूत (Lalchand Rajput) यांनी संघाच्या मुख्य प्रशिक्षकापदासाठी अर्ज केला असल्याचे वृत्त समोर आले आहे. राजपूत झिम्बाब्वे (Zimbabwe) संघाचे प्रशिक्षक होते. पण आयसीसीने (ICC) झिम्बाब्वे क्रिकेटला सरकारी हस्तक्षेपामुळे स्थगिती दिल्यानंतर त्यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या पदासाठी आवड दर्शवली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राजपूत यांनी दुबई विमानतळावरून निर्धारित मुदतीपूर्वी बीसीसीआयकडे अर्ज पाठविला आहे. माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 चा पहिला टी-20 विश्वचषक जिंकला तेव्हा राजपूत हे टीमच्या व्यवस्थापकपदाचा कारभार सांभाळत होते. (भारताचे माजी खेळाडू रॉबिन सिंह यांचा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज; रवी शास्त्रींवर साधला निशाणा)
भारताकडून खेळलेले मुंबईचे माजी सलामीवीर राजपूत टी-20 मुंबई लीगमधील संघाशिवाय अफगाणिस्तान आणि स्थानिक आसाम संघाला प्रशिक्षण दिले आहेत. इंडियनएक्सप्रेसच्या वृत्तानुसार राजपूतच्या जवळच्या एका सूत्रांनी सांगितले की, राजपूत हे मुख्य प्रशिक्षकपदाचा विचार करत नसल्याचे सांगितले आहे आणि बीसीसीआयला (BCCI) फलंदाजी प्रशिक्षकासाठी त्यांचा विचार करण्याची विनंती केली आहे.
विश्वचषक सेमीफायनलमधील पराभवानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ बदलाच्या हालचालींनी जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी भारताचा अष्टपैलू खेळाडू रॉबिन सिंह याने देखील मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयकडे अर्ज दाखल केला होता. भारतीय क्रिकेट बोर्ड, बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. आणि सध्या कार्यरत असलेल्या प्रशिक्षकांना आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत 45 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या मार्गदर्शनाखालील त्रिसदस्यीत समिती यंदा मुख्य प्रशिक्षकाची निवड करणार आहे. या समितीत देव यांच्यासह माजी खेळाडू अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे.