दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (India vs South Africa) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी (ODI Series) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, शिखर धवन (Hardik Pandya, Shikhar Dhawan, Bhuvneshwar Kumar) हे भारतीय संघात परतले आहेत. त्याचबरोबर शुभमन गिललाही वनडे संघात संधी मिळाली आहे. विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरूद्ध एकदिवसीय मालिकादेखील खेळेल आणि तो कर्णधार असेल. त्याचवेळी रोहित शर्मा अजूनही फिट नसल्याने त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. न्यूझीलंड विरुद्ध टी-20 मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतूनही बाहेर पडला होता.
या वनडे मालिकेचे सामने 12, 15 आणि 18 मार्च रोजी खेळले जातील. या एकदिवसीय मालिकेसाठी फलंदाजीची जबाबदारी शिखर धवन, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, केएल राहुल, विराट कोहली यांना देण्यात आली आहे. मनीष पांडे, श्रेयसर अय्यर यांना मिडल ऑर्डरमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत पंड्या आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. विकेटकीपिंगची जबाबदारी ऋषभ पंत याच्याकडे देण्यात आली आहे. गोलंदाजी जबाबदारी भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि नवदीप सैनी यांच्या खांद्यावर असेल. तर स्पिनची जबाबदारी युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यावर असेल.
असा असेल भारतीय संघ - शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, शुभमन गिल (हेही वाचा: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्या नेतृत्वाखाली India Legends संघाचा West Indies Legends संघावर 7 विकेट राखून विजय)
टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी मयंक अग्रवाल आणि मोहम्मद शमीला संघाबाहेर ठेवले आहे. मुख्य निवडक सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. न्यूझीलंड दौर्यादरम्यान अत्यंत खराब कामगिरी करणारे शार्दुल ठाकूर आणि शिवम दुबे यांनाही वनडे संघातून वगळण्यात आले आहे.