India National Hockey Team vs Pakistan National Hockey Team: भारतीय राष्ट्रीय हॉकी संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय हॉकी संघ यांच्यात एक रोमांचक सामना शनिवारी, 14 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना 1.15 वाजता हुलुनबुर येथील मोकी ट्रेनिंग बेसवर खेळवला जाईल. या टूर्नामेंटमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान 350 दिवसांनंतर आमनेसामने येणार आहेत. याच स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये शेवटचा सामना 30 सप्टेंबर 2023 रोजी झाला होता. या हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तान संघासाठी विजय अत्यंत महत्त्वाचा असेल, अशा स्थितीत सामन्याचा उत्साह आणखी वाढेल.
टीम इंडिया पॉइंट टेबलवर पहिल्या स्थानावर
या स्पर्धेत टीम इंडिया आतापर्यंत 4 विजय आणि 12 गुणांसह पॉइंट टेबलवर पहिल्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानला 3 विजय आणि 1 पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यासह पाकिस्तान संघ 5 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. आता हे अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीपूर्वी उद्या गट सामन्यात आमनेसामने येणार आहेत. या दोघांमध्ये कोणाचा वरचा हात आहे ते पाहूया.
आकडेवारीत कोण आहे वरचढ?
हॉकीच्या इतिहासात टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये एकूण 180 सामने खेळले गेले आहेत. या काळात पाकिस्तानचा संघ वरचढ राहिला आहे. पाकिस्तानने 82 सामने जिंकले आहेत, तर टीम इंडियाने 66 सामने जिंकले आहेत. तर 32 सामने अनिर्णित राहिले आहेत. मात्र, 2013 पासून टीम इंडियाने पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले आहे. या कालावधीत 25 सामने खेळले गेले, ज्यामध्ये टीम इंडियाने 16 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तान संघाने केवळ 5 सामने जिंकले आहेत, तर 4 सामने अनिर्णित राहिले आहेत.
हे देखील वाचा: IND vs PAK Asian Champions Trophy 2024 Live Streaming: भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला! कधी आणि कुठे पाहता येणार सामना? वाचा सविस्तर
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही टीम इंडियाचा वरचष्मा
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही टीम इंडियाचा वरचष्मा राहिला आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये 11 सामने झाले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 7 सामने जिंकले असून 2 सामने पाकिस्तानच्या नावावर आहे. तर 2 सामने अनिर्णित राहिले. गेल्या वेळी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते तेव्हा टीम इंडियाने पाकिस्तानचा 10-2 असा पराभव केला होता.
असा आहे भारत आणि पाकिस्तानचा आतापर्यंतचा प्रवास...
हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली असून अपराजित राहिली आहे. टीम इंडियाने चीनचा 3-0 असा पराभव करून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. यानंतर त्यांनी पुन्हा जपान आणि मलेशियाचा 5-0 आणि 8-1 असा पराभव केला. यानंतर त्यांनी कोरियाचा 3-1 असा पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. दुसरीकडे, पाकिस्तान संघाने या स्पर्धेत मलेशिया आणि कोरियाविरुद्ध 2-2 अशी बरोबरी साधली आणि त्यानंतर जपानचा 2-1 असा पराभव केला. यानंतर पाकिस्तान संघाने चीनचा 5-1 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या.
पाहा दोन्ही संघाचे खेळाडू
टीम इंडिया : अभिषेक, अली अमीर, हुंदल अरिजित सिंग, करकेरा सूरज (गोलकीपर), राज कुमार पाल, कृष्ण बहादूर पाठक (गोलकीपर), प्रसाद विवेक सागर, राहिल मोहम्मद, रोहिदास अमित, संजय, शर्मा नीलकंठ, गुरजोत सिंग, हरमनप्रीत सिंग (कॅप्टन), जरमनप्रीत सिंग, जुगराज सिंग, मनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, उत्तम सिंग, विष्णुकांत सिंग, सुमित.
पाकिस्तानः अब्दुल रहमान, अहमद अजाझ, अली गझनफर, बट अम्माद (कर्णधार), हम्मुद्दीन मुहम्मद, हयात जिक्रिया, खान अब्दुल्ला इश्तियाक (गोलरक्षक), खान सुफियान, लियाकत अर्शद, महमूद अबू, नदीम अहमद, कादिर फैसल, राणा वाहीद अश्रफ, रज्जाक सलमान, रुम्मान, शाहिद हन्नान, शकील मोईन, उर-रहमान मुनीब (गोलकीपर).