मंगळवारी मँचेस्टरमध्ये आयसीसी विश्वचषक 2019 (World Cup 2019) च्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand Semi-Final) एकमेकांसोबत भिडणार आहेत. दोन्ही बाजूच्या चाहत्यांची फार मोठी अपेक्षा आपापल्या संघाकडून आहे, मात्र या सामन्यावर पावसाचे सावट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. मंगळवारी सामना खेळला गेला नाही तर, तो दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी (10 जुलै) रोजी खेळला जाईल जो 'रिजर्व डे' असेल. दुर्दैवाने, 'रिझर्व्ह डे'चा हवामान अंदाज पाहता त्या दिवशीही पावसाची शक्यता आहे.
जर का 'रिझर्व्ह डे' च्या दिवशीही पाऊस झाला तर मात्र, आयसीसीच्या नियमाप्रमाणे दोन्ही टीमला प्रत्येकी एक-एक गुण दिले जातील. यामुळे भारताचे गुण 16 होतील. तर न्यूझीलंडचे गुण 12 होतील. अशाप्रकारे पाऊस जरी झाला तरी भारत न्यूझीलंडच्या पुढेच असेल. महत्वाची गोष्ट म्हणजे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लीग स्टेज सामनाही असाच रद्द झाला होता. सध्या दिलेल्या वेळेत पाऊस थांबल्यास डीएलएस पद्धत (DLS Method) वापरली जाईल. एक किंवा दोन्ही संघ कदाचित 50 ओव्हर खेळू शकणार नाहीत, त्यानंतर दोन्ही संघासाठी वेगळे लक्ष्य ठरवण्यात येईल. (हेही वाचा: IND vs SL मॅचमध्ये टीम इंडियाकडून श्रीलंकेचा 7 विकेट्सनी धुव्वा, गुणतालिकेत मिळवले पहिले स्थान)
शनिवारी श्रीलंकेवर सात विकेट राखून विजय मिळविल्यानंतर, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नऊ सामन्यांत 15 गुणांसह टेबल टॉपर्स म्हणून उभा राहिला आहे. दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड संघ चौथ्या स्थानावर आहे. 9 सामन्यापैकी 3 सामन्यात त्यांचा पराभव झाल्याने त्यांना एकूण 11 गुण मिळाले आहेत. दरम्यान, भारत वि. न्यूझीलंड पहिली सेमीफायनल झाल्यानंतर, आॅस्ट्रेलिया वि. इंग्लंड हा दुसरा सेमीफायनल 11 जुलैला होईल. त्यानंतर दोन्ही विजयी संघांमध्ये 14 जुलै रोजी लाॅर्ड्सवर शेवटचा विश्वचषक सामना होईल.