India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team 2nd Test 2024: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना (IND vs NZ 2nd Test) पुण्यात (Pune) होणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर टीम इंडिया दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयाच्या शोधात आहे. बंगळुरू कसोटीत पावसाने सामन्याची मजा कशी बिघडवली हे पाहायला मिळाले. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ नाणेफेक न होता रद्द करण्यात आला. त्यामुळे टीम इंडियाचेही नुकसान झाले. पुणे कसोटीत पाऊस 'खलनायक' ठरू शकतो, असा प्रश्न आता चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे. (हे देखील वाचा: IND vs NZ 2nd Test 2024: पुण्यात टीम इंडियाचा कसा आहे 'विक्रम', आकडेवारीवर टाका एक नजर)
कसे असेल उद्या पुण्याचे हवामान?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्यात सुरू होणार आहे. 24 ऑक्टोबर रोजी पुण्याचे हवामान स्वच्छ असल्याचे हवामान खात्याने सांगितले. तापमान 32 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. याशिवाय पावसाची शक्यता नाही. अशा परिस्थितीत चाहत्यांना यावेळी संपूर्ण सामना बघायला मिळू शकतो. पुण्यात मात्र अंशत: ढगाळ वातावरण राहील.
भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होऊ शकतात बदल
पुणे कसोटीत टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळू शकतात. एकीकडे शुभमन गिल दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे, तर दुसरीकडे मोहम्मद सिराजला खराब कामगिरीमुळे प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. केएल राहुलही या सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. राहुल सतत खराब फॉर्ममधून जात आहे.
टीम इंडिया 1-0 ने मागे
बंगळुरू कसोटीतील पराभवानंतर टीम इंडिया आता तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे. पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाची फलंदाजी खूपच खराब झाली होती. टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये अवघ्या 46 रन्सवर ऑलआऊट झाली होती. त्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात शानदार पुनरागमन केले, पण संघाला विजय मिळवता आला नाही.