विराट कोहली, भारत-ऑस्ट्रेलिया वनडे (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) पु्न्हा एकदा कोरोना (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर राज्य सरकारने भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिका (India Vs England ODI Series 2021) प्रेक्षकांविना खेळण्यास परवानगी दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकटकर यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध शहरात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करून एकदिवसीय मालिका बंद दाराच्या मागे खेळली जाणार आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 23 मार्चला खेळला जाणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 26 मार्चला तर, तिसरा सामना 28 मार्चला होणार आहे. इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाने चांगली कामगिरी करून दाखवली आहे. यामुळे एकदिवसीय मालिकेतही भारत चांगले प्रदर्शन दाखवेल, अशी अपेक्षा केली जात आहे. हे देखील वाचा- IPL 2021: महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या संख्येने BCCIच्या चिंतेत वाढ, प्लेऑफ ‘या’ आयोजन करण्याबद्दल विचार

महाराष्ट्रात आज 8 हजार 623 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात आज 3 हजार 648 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकूण 20 लाख 20 हजार 951 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 72 हजार 530 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.14% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.