India Vs England 1st ODI 2021: पहिल्याच एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट? येथे पाहा हवामान खात्याचा अंदाज आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचा पिच रिपोर्ट
Maharashtra Cricket Association Stadium (Photo Credit: Wikimedia Commons)

भारत दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडच्या संघाला कसोटी आणि टी-20 मालिकेत धुळ चारल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता एकदिवसीय मालिकेवर तिरंगा फडकवण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना (India Vs England 1st ODI) आज खेळला जाणार आहे. पुण्यातील (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानावर (Maharashtra Cricket Association Stadium) हा सामना पार पडणार आहे. या मैदानातील खेळपट्टी कशी आहे? हवामान कसे आहे आणि या मैदानावर भारतीय संघाचे रेकॉर्ड कसे आहे? हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानात 2013 ते 2018 दरम्यान आतापर्यंत एकूण 4 एकदिवसीय सामने खेळले गेले. त्या सामन्यांमध्ये भारतीय संघाला 2 सामन्यात विजय मिळवता आला तर, दोन सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. तसेच या मैदानात 2 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. यातही भारतीय संघाने एकात विजय मिळवला आणि दुसऱ्या सामन्यात पराभूत झाले आहेत. याचबरोबर टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे 3 सामने या मैदानात पार पडले आहेत. या सामन्यात भारताने 2 सामने जिंकले आणि 1 सामन्यात विरोधी संघाने विजय मिळवला आहे.

जर आपण पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी तयार केलेली खेळपट्टी फलंदाजासाठी अधिक फायदेशीर ठरु शकते. या मैदानातील बॉन्ड्री लहान असल्याने संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या खेळपट्टीवर सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर फिरकीपटूंनाही मदत मिळू शकते. यामुळे संघ लक्ष्यांचा पाठलाग करण्याकडे अधिक जोर देईल. या मैदानावरील सरासरी धाव संख्या 300 च्या जवळपास आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात एमसीए स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना खेळला जाईल तेव्हा पावसाची शक्यता कमी आहे. सोमवारी संध्याकाळी पुण्यात हलका पाऊस झाला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मंगळवारी वातावरण ढगाळ असेल. परंतु, पावसाची शक्यता फारच कमी आहे. कमाल तापमान 36 डिग्री सेंटीग्रेड आणि किमान तापमान 21 अंश सेंटीग्रेड राहील अशी अपेक्षा आहे.