India vs County Select XI: 10 दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण करूनही ‘या’ करणामुळे Rishabh Pant नाही खेळणार सराव सामना, वाचा सविस्तर
रिषभ पंत (Photo Credit: PTI)

India vs County Select XI: विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वातील संघ आजपासून इंग्लंडमध्ये कसोटी स्वरुपातील सराव सामना खेळणार आहे. इंग्लंडमध्ये कोहली आणि संघ काउंटी सिलेक्ट इलेव्हन  (County Select XI) संघाविरुद्ध डरहॅम (Durham) येथे सराव सामना खेळताना दिसेल. टीम इंडिया (Team India) 4 ऑगस्टपासून ब्रिटिश संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण, कोविड-19 मधून सावरल्यानंतरही आणि दहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करूनही रिषभ पंत (Rishabh Pant) सराव टेस्ट सामन्यात सहभागी होणार नाही. 10 दिवसाचा क्वारंटाईन आणि नकारात्मक कोविड-19 चाचणींनंतर पंत पूर्णपणे बरे झाला आहे. मात्र, विकेटकीपर फलंदाजाला संघातील उर्वरित सदस्यांसह सराव खेळात भाग घेण्यापूर्वी संपूर्ण शारीरिक तंदुरुस्तीसाठी काही वेळेची आवश्यकता आहे. (IND vs ENG 2021: काउंटी XI विरुद्ध सराव सामना खेळण्यासाठी टीम इंडिया सज्ज, जाणून घ्या सामन्याची वेळ, तारीख व लाईव्ह स्ट्रीमिंग सोबत सर्व माहिती)

“सराव खेळासाठी पंतने वेळेत पोहोचलो असला तरी त्याला शारीरिक स्थितीत परत येण्यासाठी पुरेशी विश्रांती देण्यात आली असती. तो असिप्टोमॅटिक आहे, पण नॉटिंघॅममधील पहिल्या कसोटीपूर्वी त्याला चांगले प्रशिक्षण देणे आवश्यक होते,” बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले. दरम्यान, केवळ पंतच नाही तर रिद्धिमान साहा देखील सराव सामन्याला मुकणार आहे. साहा कोविड पॉझिटिव्ह नसला तरी तो थ्रोडाउन तज्ञ दयानंद गाराणी यांच्या जवळच्या संपर्कांपैकी एक होता आणि म्हणूनच त्याला क्वारनटाईन करण्यात आले आहेत. त्यामुळे आता साहा आणि पंतच्या अनुपस्थितीत केएल राहुल 3-दिवसीय सराव कसोटी सामन्यात यष्टिरक्षकांची भूमिका बजावेल. पंत आणि साहा दोघेही लवकरच संघात दाखल होतील आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेच्या सुरुवातीच्या सामन्यासाठी पूर्णपणे तयार होण्यासाठी अपेक्षित आहेत.

काउंटी चॅम्पियनशिप इलेव्हन सराव कसोटी सामना भारताला त्यांच्या संघाची रचना अंतिम करण्याची मोठी संधी उपलब्ध करून देत आहे. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यासाठी तयारीसाठी भारत फक्त इंट्रा-स्क्वॉड सामने खेळू शकत होता. तथापि, कर्णधार कोहलीने प्रथम श्रेणी सामन्यांची आवश्यकता निदर्शनास आणल्यानंतर बीसीसीआय ब्रिटिश संघाविरुद्ध मालिकेपूर्वी सराव सामन्याची व्यवस्था केली.