India Tour of England 2021: इंग्लंड दौऱ्यावर एक टेस्ट सामना आणि या 10 महिला खेळाडूंना डेब्यूची संधी, ‘ही’ युवा फलंदाज करणार इंग्रजांची धुलाई
भारतीय महिला टीम (Photo Credit: Twitter/BCCIWomen)

India Tour of England 2021: मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मर्यादित ओव्हर मालिकेनंतर भारतीय महिला टीम (India Women's Team) 2 जून रोजी इंग्लंड (England) दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. जून-जुलै दरम्यान होणाऱ्या दौऱ्यावर एक कसोटी, 3 वनडे आणि तितक्याच टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. 16 ते 20 जून दरम्यान कसोटी मालिकेने दौऱ्याची सुरुवात होईल जो की ब्रिस्टल (Bristol) काउंटी मैदानात खेळला जाणार आहे. इंग्लंड दौऱ्यापूवी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रविवारी मिताली राजच्या नेतृत्त्वातील  एकमेव टेस्ट सामन्यासाठी महिला संघासाठी नवीन कसोटी किटचे अनावरण केले. तब्बल 7 वर्षानंतर टीम इंडिया  (Team India) कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरणार असेल आणि हा एक किंवा दोन नाही तर तब्ब्ल 10 खेळाडूंसाठी संस्मरणीय ठरू शकतो कारण त्यांना पहिल्यांदा देशासाठी कसोटी जर्सी परिधान करण्याची संधी मिळू शकते. (IND W VS ENG W 2021: भारत-इंग्लंड महिला संघाच्या टी-20 मालिकेचे वेळापत्रक बदलले, या दिवशी रंगणार तिसरा टी-20 सामना)

इंग्लंडच्या कठीण दौऱ्यासाठी भारतीय संघाने मुंबईत क्वारंटाईन असताना मेहनत सुरु केलेली आहे. या दौऱ्यावर बीसीसीआयने टीम घोषित केली असून यामध्ये तब्बल दहा खेळाडू कसोटी पदार्पणाचे दावेदार आहेत. यामध्ये प्रिया पुनिया (Priya Punia), जेमिमाह रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues), शेफाली वर्मा (Shafali Verma), दीप्ती शर्मा, तानिया भाटिया, स्नेह राणा, इंद्राणी रॉय, पूजा वस्त्राकार, अरुंधती रेड्डी आणि राधा यादव (Radha Yadav) अशा 10 मर्यादित ओव्हर क्रिकेटच्या अनुभवी क्रिकेटपटूंना पहिल्यांदा कसोटी जर्सी परिधान करण्याची संधी मिळू शकते. प्रिया पुनिया, जेमिमाह रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, दीप्ति शर्मा, तानिया भाटिया, राधा यादव यांना कसोटी संघात संधी मिळण्याची शक्यता अधिक दिसत आहे. त्यामुळे, स्मृती मंधाना सोबत भारताची युवा तडाखेबाज टी-20 फलंदाज शेफाली वर्मा सलामीला उतरेल तर जेमिमाह तिसऱ्या स्थानावर फलंदाजीची जबाबदारी घेईल. शिवाय, संघात मंधाना, कर्णधार मिताली राज, उपकर्णधार हरमनप्रीत कौर, वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी व शिखा पांडे अशा अनुभवी खेळाडूंचा देखील समावेश आहे.

अशास्थितीत अनुभवी आणि युवा खेळाडूंनी मिश्रित टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध जबरदस्त खेळी करण्यासाठी उत्सुक असेल. टी-20 आणि वनडे क्रिकेटनंतर टेस्ट क्रिकेटमध्ये विरोधी संघाची धुलाई करण्यासाठी युवा फलंदाज शेफाली वर्मा देखील उत्सुक असेल. त्यामुळे इंग्लंड संघाविरुद्ध भारतीय संघ कोणता प्लेइंग इलेव्हन मैदानावर उतरवलं आणि कोणत्या नवीन खेळाडूंना संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय महिला संघ: मिताली राज (कर्णधार), स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), पूनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमिमह रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटिया (विकेटकीपर) ), इंद्राणी रॉय (यष्टीरक्षक), झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्राकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट, राधा यादव.