IND Beat SA: भारताने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा केला पराभव, ICC U19 World Cup च्या अंतिम फेरीत मारली धडक
Team India (Photo Credit - X)

IND Beat SA: अंडर-19 वर्ल्ड कप 2024 चा (U19 World Cup 2024) पहिला सेमीफायनल सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात उदय सहारनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा 2 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टीम इंडियाने सातव्यांदा अंडर-19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता भारतीय संघाची अंतिम फेरीत दुसरी उपांत्य फेरी जिंकणाऱ्या संघाशी होणार आहे. या सामन्यात फलंदाजी करताना भारतीय संघाला पहिले चार धक्के 38 धावांच्या आतच बसले. यानंतर कर्णधार उदय सहारन आणि सचिन दास यांनी केवळ डाव सांभाळला नाही तर भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला.

कर्णधार घेवून गेला विजयाच्या उंबरठ्यावर

मात्र, सचिन दास सामन्याच्या शेवटपर्यंत टिकू शकला नाही. या सामन्यात सचिनचे शतक हुकले पण त्याने शानदार खेळी केली. या खेळीत सचिनने 11 चौकार आणि एक षटकार लगावला. या सामन्यात सचिन दासच्या बॅटमधून 96 धावा झाल्या. याशिवाय कर्णधार उदय सहारनने 81 धावांची खेळी केली. या सामन्यात उदय सहारनने कर्णधारपदाची खेळी खेळली. एका टोकाकडून सातत्याने विकेट पडल्यानंतर उदयने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले.

दक्षिण आफ्रिकेने केल्या 244 धावा 

अंडर-19 विश्वचषक 2024 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी गमावून 244 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना लुआन-ड्रे प्रिटोरियसने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. याशिवाय रिचर्डने 64 धावा केल्या. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना राज लिंबानीने सर्वाधिक 3 बळी घेतले. याशिवाय मुशीर खानने 2 आणि सौम्या पांडेने एक विकेट घेतली. (हे देखील वाचा: IND vs ENG 3rd ODI: तिसऱ्या कसोटीत भारताची प्लेईंग 11 पूर्णपणे बदलणार! रोहित 'या' 5 खेळाडूंना वगळणार)

भारताने 48.5 षटकांत मिळवला विजय 

उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला विजयासाठी 245 धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे टीम इंडियाने 8 विकेट्स गमावून 48.5 ओव्हरमध्ये पूर्ण केले. एकेकाळी भारतीय संघ या सामन्यात खूप मागे होता. भारतीय संघाला 8 धावांच्या आत दोन मोठे धक्के बसले होते. या सामन्यात फलंदाज मुशीर खान फार काही करू शकला नाही. मुशीर खान अवघ्या 4 धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार उदय सहारन आणि सचिन दास यांनी भारतीय डावाची धुरा सांभाळत विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

टीम इंडिया सातव्यांदा फायनलमध्ये पोहोचली 

दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारतीय संघाने सातव्यांदा अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. याशिवाय टीम इंडियाने सर्वाधिक 5 वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. टीम इंडियाने 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे. टीम इंडिया ज्या फॉर्ममध्ये आहे, ती पुन्हा एकदा अंडर-19 विश्वचषक विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे.