
IND W vs PAK W World Cup 2022: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत मिताली राज (Mithali Raj) हिच्या टीम इंडियाने (Team India) पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान (Pakistan) संघावरील आपले वर्चस्व कायम ठेवले आणि बे ओव्हल येथे सलामीच्या सामन्यात 107 धावांनी जोरदार विजय मिळवून विश्वचषकची जोरदार सुरुवात केली. भारताच्या विजयात स्नेह राणा (Sneh Rana), स्मृती मंधाना, राजेश्वरी गायकवाड आणि पूजा वस्त्रकर (Pooja Vastrakar) यांनी निर्णायक भूमिका बजावली. स्मृती, स्नेह आणि पूजा यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 245 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजी आक्रमणापुढे गुडघे टेकले आणि 43 षटकांत फक्त 137 धावाच करू शकले. राजेश्वरीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर झुलन गोस्वामी आणि स्नेह राणा यांनी दोन व दीप्ती शर्मा-मेघना सिंग हिला एक विकेट मिळाली. (IND W vs PAK W World Cup 2022: टीम इंडियाने 18 धावांत 5 विकेट गमावल्यानंतर स्नेह राणा-पूजा वस्त्राकर यांनी अशी संघाची नौका पार केली)
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. शेफाली वर्मा खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतली. यानंतर दीप्ती शर्माने स्मृती मंधाना हिला चांगली साथ दिली आणि तिसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. पण दीप्ती बाद होताच संघ पत्त्यासारखा विखुरला. 96 धावसंख्येवर दुसरी विकेट गमावलेल्या भारताने 114 वर 6 विकेट गमावल्या. दीप्ती शर्मा, मिताली राज, हरमनप्रीत कौर, स्मृती, आणि रिचा घोष अवघ्या 18 धावांत झटपट बाद झाल्या. पाकिस्तानने धुरंधर खेळाडूंना बाद करून सामन्यात पुनरागमन केलं पण स्नेह राणा आणि पूजा वस्त्राकर यांनी 7व्या विकेटसाठी 122 धावांची विश्वविक्रमी भागीदारी रचून भारताचा मोर्चा सांभाळला. राणा 53 धावा करून नाबाद परतली तर पूजाने सर्वाधिक 67 धावा केल्या. उल्लेखनीय आहे की या दोघी खेळाडूंचा हा पहिला विश्वचषक सामना आहे. महिला विश्वचषकमध्ये सातव्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा विक्रम आता या दोघींच्या नावावर झाला आहे.
प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला पाकिस्तान संघ भारतीय गोलंदाजांपुढे तळ ठोकून खेळू शकला नाही. सिद्रा अमीन आणि जवरिया खान यांनी संघाला सावध सुरुवात करून दिली, पण भारत नियमित अंतराने विकेट घेत असल्यामुळे भारताविरुद्ध विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला चौथा पराभव पत्करावा लागला आहे. सिद्रा अमीनने 30 धावा केल्या तर डायना बेग धावा करून नाबाद परतली.