
IND W vs AUS W 2nd ODI: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ३० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या महिला वनडे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे, आता दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाला मालिका १-१ ने बरोबरीवर आणण्यासाठी विजय मिळवणे अनिवार्य आहे. पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे, दुसऱ्या सामन्यात त्यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल.
कुठे खेळला जाणार दुसरा वनडे सामना?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील दुसरा वनडे सामना मुल्लानपूर येथील न्यू चंदीगड येथील महाराजा युधवीर सिंग पीसीए स्टेडियममध्ये आज, १७ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. या मैदानावर आतापर्यंत केवळ एकच आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला गेला आहे, जो याच दोन संघांमधील मागील सामना होता. येथील खेळपट्टीवर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो, कारण नंतर दव पडल्यामुळे फलंदाजी करणे सोपे होऊ शकते. त्यामुळे या सामन्यात नाणेफेक निर्णायक ठरेल.
कधी आणि किती वाजता सुरू होणार सामना, कुठे पाहाल लाईव्ह?
मुल्लानपूर स्टेडियममध्ये होणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याची सुरुवात १७ सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता होईल. या सामन्यासाठीची नाणेफेक दुपारी १ वाजता होणार आहे.
- थेट प्रक्षेपण: भारतात या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (Star Sports Network) केले जाईल.
- लाइव्ह स्ट्रीमिंग: सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) ॲपवर पाहता येईल.
दोन्ही संघांचे स्क्वॉड
भारतीय महिला संघ: प्रतिका रावल, स्मृती मंधाना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, श्री चरणी, स्नेह राणा, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, उमा छेत्री, सायली सतघरे.
ऑस्ट्रेलिया महिला संघ: एलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), फोएबे लिचफील्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, एनाबेल सदरलँड, ॲश्ले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, जॉर्जिया वेअरहेम, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शुट, ग्रेस हॅरिस, सोफी मोलिनक्स, निकोल फाल्टम, चार्ली नॉट, डार्सी ब्राउन, जॉर्जिया वॉल.