IND vs WI T20 Series: वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबई टी-20 सामन्यावर संकट, मुंबई पोलिसांनी मॅच इतरत्र हलवण्याची केली मागणी, जाणून घ्या कारण
(Photo Credit: Twitter/Getty)

वेस्ट इंडिज संघ डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) संघीय तीन सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे (Wankhede) स्टेडियमवर खेळला जाणार आहे, मात्र त्यावर संकट ओढवू लागले आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ही मॅच मुंबईच्या बाहेर खेळण्यात यावी अशी मागणी केली आहे. 6 डिसेंबर ही बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांची पुण्यतिथी आहे. यामुळे शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातील आणि त्यांचे लाखो अनुयायी या कार्यक्रमांमध्ये भाग घेतील. त्यामुळे मुंबई पोलिस हाय अलर्टवर असेल आणि अशा परिस्थितीत भारत-वेस्ट इंडीज यांच्यात देशाच्या आर्थिक राजधानीत होणारा पहिला टी-20 सामन्यासाठी पूर्ण पोलीस सुरक्षा देऊ शकण्यावर मुंबई पोलिसांनी संभ्रम व्यक्त केला आहे.

मुंबई पोलिस पीआरओ म्हणाले की, "बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनाच्या विविध कार्यक्रमांमुळे मुंबई पोलिसांनी वानखेडे स्टेडियमवर 6 डिसेंबर रोजी भारत-वेस्ट इंडीज टी-20 सामन्यासाठी पोलिस सुरक्षा पुरविली जाऊ शकत नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी मुंबई क्रिकेट संघटनेला देण्यात आली आहे." त्यामुळे, आता बीसीसीआय यावर काय निर्णय घेते आणि सामना कोणत्या ठिकाणी हलवला जातो यावर सर्वांचे लक्ष लागून असणार आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी सुमारे एक हजार पोलिसांची आवश्यकता असेल.वानखेडे स्टेडियमवर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर 2017 मध्ये श्रीलंकाविरूद्ध खेळवण्यात आला होता. विंडीज संघ भारत दौऱ्यादरम्यान 3 सामन्यांची वनडे मालिकादेखील खेळणार आहे. याची सुरुवात वानखेडे स्टेडियमवरील पहिल्या टी-20 मॅचपासून होईल.

दरम्यान, पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघ न्यूझीलंड दौर्‍यावर जाईल, जेथे ते पाच टी-20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळतील. दुसरीकडे, सध्या टीम इंडिया बांग्लादेशविरुद्ध दुसऱ्या आणि अंतिम टेस्ट सामन्यासाठी कोलकातामध्ये सराव करत आहे. या सामना पिंक बॉलने खेळवण्यात येणार असून दोन्ही संघ पाहिलांदा डे-नाईट सामना खेळणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरु होईल.