IND vs WI 3rd T20I: ईशान किशन याचा बॅटने संघर्ष सुरूच, आता तरी कॅप्टन रोहित शर्मा 25 वर्षीय खेळाडूला देणार भारतीय ताफ्यात एन्ट्री?
रोहित शर्मा आणि ईशान किशन (Photo Credit: PTI)

IND vs WI 3rd T20I: भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) नेहमीच खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी ओळखला जातो. त्याने युवा फलंदाज आणि मुंबई इंडियन्स फ्रँचायझी साथीदार ईशान किशनला (IShan Kishan) अनेक संधी दिल्या, पण तो त्याच्या अपेक्षेप्रमाणे राहू शकला नाही. प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघ बांधणी करत आहेत. अशा परिस्थितीत वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) तिसऱ्या टी-20 सामन्यात रोहित किशनच्या जागी मजबूत खेळाडूला संधी देण्याचे अपेक्षित आहे. या खेळाडूला अनेक सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. विंडीजविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने (Team India) पहिले दोन्ही सामने जिंकून 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात बदल होताना दिसत आहेत. (Team India 100th T20I Victory: वेस्ट इंडिज संघावर 8 धावांनी मात करून भारताने साजरे केले विजयाने ‘शतक’)

विराट कोहली आणि रिषभ पंत यांना विंडीजविरुद्ध तिसऱ्या सामन्यातून तसेच श्रीलंका टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आल्याने रोहित ईशानसोबत सलामीला उतरणार की 25 वर्षीय रुतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) संधी देणार याकडे सर्वामध्ये लक्ष लागून असेल. वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या दोन्ही सामन्यात ईशान किशन खराब फ्लॉप ठरला. धावा करण्यात त्याला मजबूत संघर्ष करावा लागला. याशिवाय धावा काढणे तर दूरच, तो विकेटही टिकवू शकला नाही. केएल राहुल दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत खेळत नसल्यामुळे किशन रोहित शर्मासोबत सलामीला उतरला आणि दोन्ही टी-20 सामन्यात फ्लॉप ठरला. अशा स्थितीत त्याच्या जागी तिसऱ्या सामन्यासाठी रुतुराज गायकवाड याला संधी मिल्ने अपेक्षित आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात ईशान किशनने 41 चेंडूत 35 धावा केल्या. तर दुसऱ्या टी-20 सामन्यात तो फक्त 2 धावाच करू शकला. टीम इंडियाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असताना तो स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला. विंडीजविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये गायकवाडची एन्ट्री निश्चित दिसत असताना तो रोहित शर्मा सोबत सलामीला उतरेल. तर ईशान किशन आता रिषभ पंतच्या अनुपस्थितीत मधल्या फळीत फलंदाजीला उतरेल. गायकवाड सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. आणि त्याच्याकडे चेंडू मारण्याची अप्रतिम क्षमता आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने शानदार फलंदाजीचे दर्शन घडवले आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतही सलामीला उतरताना गायकवाडने धावांचा पाऊस पाडला होता.